बामणोली : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी अचानक त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब या गावी हेलिकॉप्टरने आले. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाही त्यांनी गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंद केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. कुणाशीही संवाद न साधता ते एकांतवासात गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नाराजीच्या चर्चेला आणखी ऊत आला आहे.
राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने सुरू आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेही गुरुवारी रात्री दिल्ली येथे गेले होते. गृहमंत्री अमित शहा यांची या नेत्यांनी भेट घेऊन सत्तास्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली. मुंबई येथे शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक होणार होती. मात्र या बैठकीकडे पाठ फिरवत एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने आपल्या दरे गावी पोहोचले. त्यांच्यासमवेत त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते.
दरे तांब येथे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वर बांधकाम विभागाचे अजय देशपांडे हे देखील उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी कुणाचीही भेट घेणे टाळून विश्रांती घेणे पसंत केले. ते दोन दिवसाच्या मुक्कामी दौर्यावर असून रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईकडे पुन्हा रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.