नागठाणे : मांडवे (ता. सातारा) येथील धरणवस्ती शिवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमधून विक्रीसाठी आणलेला सुमारे एक लाख रुपये किमतीचा 3 किलो 950 ग्रॅम गांजा बोरगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळासाहेब आनंदराव पवार (वय 46) व शुभम प्रकाश पवार (वय 29, रा. धरणवस्ती, मांडवे, ता. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. बोरगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला मांडवे येथे बाळासाहेब पवार व शुभम पवार हे त्यांच्या गुरांच्या शेडमध्ये गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार मंगळवारी सपोनि. धोंडीराम वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव पोलिस ठाण्यातील हवालदार दीपक मांडवे, निलेश गायकवाड, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील पोलीस अंमलदार स.फौ. अतीष घाडगे, हवालदार लक्ष्मण जगधने, हसन तडवी, राकेश खांडके, अमित माने, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव व चालक अमृत कर्पे यांनी संयुक्त छापा टाकला.
छाप्यादरम्यान संशयित बाळासाहेब पवार व शुभम पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे जवळपास 4 किलो गांजा आढळून आला. खात्री करून नायब तहसीलदारांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले तसेच पोलिसांचे श्वान पथकही बोलावण्यात आले. पंचनामा करून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास बोरगाव पोलीस करत आहेत.