सातारा : आखातील देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने गॅस सिलेंडरची अवैध विक्री होऊ नये. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम उघडण्यात आली आहे. जिल्ह्यात 11 पथके स्थापन करण्यात आली आहेत. अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी सांगितले.
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या तीनही कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच जिल्ह्यातील संबंधित कंपन्यांचे गॅस व पेट्रोल वितरकांची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील तसेच गॅस कंपन्यांचे अधिकारी, गॅस एजन्सीधारक प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच एल.पी.जी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल, असे संबंधित गॅस वितरकांकडून सांगण्यात आले. गॅस कंपन्यांकडून घरगुती एल. पी. जी. सिलेंडरचे ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिला सिलेंडर घेतल्यापासून 26 दिवस झाल्याशिवाय दुसरा गॅस सिलेंडर बुक करता येणार नाही, असे बदल प्रणालीमध्ये केलेले आहेत. त्यामुळे 25 दिवसानंतरच दुसऱ्या सिलेंडरचे नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकणारी इंधन टंचाई आणि घरगुती एलपीजी गॅसचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्येही घरगुती गॅसच्या अनाधिकृत वापराला पायबंद घालण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल, ढाबे, व्यावसायिक आस्थापना किंवा औद्योगिक कारणांसाठी करता येणार नाही. अशा ठिकाणी पथकांमार्फत अचानक तपासणी करून सिलिंडर जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा वैशाली राजमाने यांनी दिला.