मेढा : जावली तालुक्याच्या पूर्व भागात असणार्या रिटकवली परिसरातील गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, या चोरट्यांनी शेती पंपाच्या केबल चोरी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. दोन महिन्यात दोन वेळा याच शेतकर्यांच्या शेतीपंपाची केबल चोरल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
मेढा परिसरात चोरट्यांनी शेतकर्यांना भंडावून सोडले आहे. ऐन गहू पोसण्याच्या वेळेत व उसाला पाणी देण्याच्या काळात केबल चोरीला गेल्याने शेती करू का नको? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. मेढा परिसरात वेण्णा नदी पात्रात अनेक जलसिंचन उपसा योजना आहेत. यामधून शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युत मोटारी बसवण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाखो रूपये खर्च करून केबलही टाकण्यात आल्या आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी चोरटे डाव साधून या वस्तू चोरून नेत आहेत. शेतकर्यांचे नुकसान होत असून या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलिस करतात तरी काय? असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.
ज्ञानेश्वर साहेबराव मर्ढेकर, महेश जयसिंग मर्ढेकर, सर्जेराव दादू मर्ढेकर या तीन शेतकर्यांची तब्बल 350 फूट म्हणजे 50 हजार रुपये किंमतीची केबल चोरीला गेली आहे. एकदा नाही तर दोन वेळा याच शेतकर्यांच्या केबल चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रात्रीचा शाळू डुकरांपासून वाचवण्यासाठी डोंगर माथ्यावरील शेतीमध्ये जाऊन रात्रभर राखण करायची की नदीवर असणार्या मोटारीच्या केबल चोरांकडे लक्ष ठेवायचे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत.
चोरट्यांनी शेतीपंपाच्या विद्युत केबल चोरून नेण्याचा सपाटा लावला आहे. दक्षिण विभागातील करंदी, निझरे, काळोशी, पिंपरी या विभागातही केबल चोरीसाठी चोरांची टोळी सक्रिय आहे. या विभागातही दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी केबल चोरली होती. त्याचा शोध आजअखेर पोलिसांच्या दरबारात लागला नाही.
चोरटे मेढा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत तीन वेळा तक्रारी करूनही मेढा पोलिस याची दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. तसेच ज्या तक्रारी दाखल आहेत त्याचाही छडा पोलिसांना लावता आलेला नाही. चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले असताना पोलिस मात्र मटका, जुगार व्यवसाय करणार्यांवर कारवाई करण्यात मग्न आहेत. मात्र जगाचा पोशिंदा न्याय हक्कासाठी भांडत आहे. त्याच्याकडे लोकप्रतिनिधींपासून पोलिसांपर्यंत दुर्लक्षित होत असल्याचे चित्र सध्या जावलीत आहे.