दहिवडी : माण तालुक्यातील आंधळी व दहिवडीत गुरुवारी मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी आंधळी येथून पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर दहिवडीतील होलसेल दुकानातून तीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंधळी येथील कमल तानाजी शेंडे या एक जून ते बारा जून दरम्यान परगावी गेल्या होत्या. घरी आल्यावर त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यात दागीने व रोख रक्कम आहे का पाहिले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांना दागिने सापडले नाहीत. सोन्याची मोहनमाळ, कानातील फुले, नथ व रोख रक्कम सहा हजार रुपये अशी एकूण एक लाख पंचाहत्तर रुपयांची चोरी झाल्याची तक्रार शेंडे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक धोंगडे करत आहेत. दुसर्या घटनेत दहिवडी येथे गुरुवारी मध्यरात्री गुरुप्रसाद मारुती मोरे यांच्या किराणा होलसेल दुकानाच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून चोरट्यांनी पाच हजारांची बिस्कीटे व रोख पंचवीस हजार रुपये लंपास केले. दोन्ही ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर व दहिवडीचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी भेट दिली असून तपास आर. एस. गाढवे करत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा दोन्ही चोर्यांच्या नोंदी दहिवडी पोलिस ठाण्यात झाल्यानंतर दहिवडी मधील दुकानात झालेली चोरी उघडकीस आणण्यासाठी तातडीने यंत्रणा कामाला लावून प्रयत्न सुरू केले होते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सागर सुभाष चव्हाण (रा.दहिवडी) याला ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याचे कबूल करून चोरलेले पंचवीस हजार रुपये पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.