पृथ्वीराज चव्हाण File Photo
सातारा

Bogus voters : दोघांचे तीन तर सात जणांचे नाव दोन मतदार यादीत

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कुटूंबीय कराड दक्षिणसह पाटण मतदारसंघात समाविष्ट असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

कराड ः मत चोरीचा दावा करत काँग्रेस महायुती शासनावर नेहमीच टीका करते. कराड दक्षिणसह राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदार यांद्यावर आक्षेप नोंदवित याबाबत न्यायालयात जाण्याची भाषा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करत आहेत. मात्र त्यांच्याच कुटूंबातील 9 जणांची नावे दोन तसेच तीन ठिकाणच्या वेगवेगळ्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचा दावा करत भाजपा पदाधिकार्‍यांनी पोलखोल केली आहे. इंद्रजित चव्हाण यांच्यासह दोघांची नावे तीन ठिकाणी तर अन्य सात जणांची नावे दोन ठिकाणी असल्याबाबतच्या मतदार याद्याच भाजपा पदाधिकार्‍यांनी सादर केल्या आहेत.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांकडून राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांवर आक्षेप घेतला जात असून महायुती शासनावर मत चोरीचा आरोप केला जात आहे. याबाबत मतदार याद्यांची पडताळणी करण्यासाठी काँग्रेसने समिती स्थापन केली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदार याद्यांच्या विषयावर न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चार दिवसापूर्वी कराड दक्षिणेत 48 हजार मतदारांवर आक्षेप घेत मत चोरीचा आरोप केला होता. तत्पूर्वी भाजपाचे मोहनराव जाधव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे पीए गजानन आवळकर यांच्याबाबत आक्षेप घेत त्यांची कराड दक्षिणमधील वाठार गावासह कराड शहरात मतदार यादीत नाव असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता भाजपाचे तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील, मोहनराव जाधव, सुहास जगताप यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कुटूंबियांवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने मतदार यादीवर घेतलेले आक्षेप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही सुद्धा मतदार यादीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कराड दक्षिणमधील मतदार यादीची पडताळणी अजूनही सुरूच आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही पुन्हा लोकांसमोर सत्य घेऊन जाणार आहोत असे भाजपा पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे राहुल चव्हाण यांनी आठ वर्षापूर्वी कुंभारगावमधून पाटण पंचायत समिती निवडणूक लढविली होती. त्यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ इंद्रजित चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी यांची नावे केवळ कुंभारगावमधील मतदार यादीतच आहेत असे नाही. यापैकी इंद्रजित चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांची नावे कराड शहरातील आणि मलकापूर शहरातील मतदार यादीत सुद्धा समाविष्ट आहेत. याशिवाय राहुल चव्हाण व त्यांच्या पत्नीचे नाव कराड शहरातील मतदार यादीत समाविष्ट आहे. याशिवाय अभिजीत इंद्रजित चव्हाण यांचे नाव मलकापूरमधील यादी भाग क्रंमाक 189 मध्ये दोनदा नाव आहे. याशिवाय उर्वरित सदस्यांची नावे कराड व मलकापूर शहरातील मतदार यादीत समाविष्ट आहेत, असा दावा पत्रकार परिषदेत भाजपा पदाधिकार्‍यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.

सन 2014 पासून नावे असल्याचा दावा...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटूंबातील लोकांची नावे सन 2014 पासून कराड व मलकापूरच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. काही निवडणुकीत त्यांनी कराड व मलकापूमरमध्ये मतदान केल्याचे लोक सांगतात आणि पृथ्वीराज चव्हाण यांना राजकीय फायदा व्हावा हाच यामागचा हेतू असल्याचा दावा भाजपा पदाधिकार्‍यांनी केला आहे.

पत्ते आणि वयात बदल...

कराड, मलकापूरसह कुंभारगावमध्ये मतदार नोंदणी करताना वास्तव्याचे पत्ते वेगवेगळे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वयात सुद्धा चार ते पाच वर्षाचा फरक दिसतो. कागदपत्रे दिल्याशिवाय निवडणूक आयोगाकडून मतदार यादीत नोंदणी होत नाही. त्यामुळे कागदपत्रे न देताच दुबार आणि तिबार मतदार नोंदणी झाली का ? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा पदाधिकार्‍यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची याला मूक संमती होती का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT