Satara News 
सातारा

Satara News: साताऱ्यात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; कृषी विभागाच्या धडक कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara bogus fertilizer scam: याप्रकरणी सातारा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल केलाआहे.

पुढारी वृत्तसेवा

सातारा: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खत पोहोचवण्याच्या नावाखाली, चक्क 'वडाप' पद्धतीने म्हणजेच कारमधून फिरून बोगस खतांची विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा सातारा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. शहरातील अजिंठा चौकात केलेल्या या धडक कारवाईत, पथकाने सुमारे १ लाख २३ हजार रुपयांची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त केली आहेत.

याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कडू एकनाथ अधाने (वय ५३, रा. दिलवशी कॅन्टोन्मेंट, ता. गंगापूर) आणि गणेश चंद्रभान साळुंखे (रा. रायपूर देवगाव, ता. गंगापूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

असा रचला सापळा

जिल्हा गुणवत्ता निरीक्षक संजय फडतरे यांना 'जी. एस. ऍग्रो' या कंपनीची बनावट खते आणि औषधे सातारा जिल्ह्यातील शिवथर, तडवळे, रहिमतपूर आणि पुसेगाव या भागांत विकली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे आणि कृषी अधिकारी युवराज काटे यांच्या नेतृत्वाखाली एक भरारी पथक तयार करण्यात आले. या पथकाला संशयित टाटा सुमो गाडी (क्र. एम. एच. २० बीसी ८१५८) अजिंठा चौकात असल्याची माहिती मिळाली. कारवाई करण्यापूर्वी पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. ग्राहकाने खत खरेदी करताच, पथकाने तात्काळ गाडीवर छापा टाकला.

कारवाईत काय सापडले?

गाडीची तपासणी केली असता, त्यात विविध प्रकारची बनावट उत्पादने आढळून आली. कृषी विभागाने सात प्रकारची बनावट खते, १ लाख २३ हजार ९४० रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. ही उत्पादने कोणत्याही परवानगीशिवाय आणि योग्य मानकांशिवाय विकली जात होती.

शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

या कारवाईमुळे शेतकऱ्यांची होणारी मोठी फसवणूक टळली आहे. आरोपींवर कीटकनाशक कायदा, खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अशा फिरत्या विक्रेत्यांपासून सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते व औषधे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात बोगस खते विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT