कराड : कराडमधील मेट्रोपोलिस या पॅथॉलॉजीविरोधात तीन दिवसापूर्वी कराडमधीलच डॉ. संदीप यादव यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कराड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मात्र त्याचवेळी डॉ. संदीप यादव यांनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक माहिती समोर आली असून आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होताना पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर राज्य शासनासह प्रशासनाचा निष्काळजीपणा सुद्धा समोर आला असून राज्यासह सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्यासह जीवाशी सुरू असणारा खेळ थांबणार की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कराड शहरातील मेट्रोपोलिस पॅथॉलॉजीवर तीन दिवसांपूर्वी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या गैरहजेरीत बनावट सहीद्वारे रिपोर्ट रूग्णांना दिले जात असल्याचा दावा तक्रारदार डॉक्टर संदीप यादव यांनी केला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मेट्रोपोलिसकडून तक्रारीतील दावे खोडून काढत सर्व कायदेशीर बाबींचे पालन केले जात असल्याचा दावा केला जात आहे. तक्रारीनंतर कराड शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून लवकरच यातील सर्व सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. संदीप यादव यांनी केलेले दावे खूपच धक्कादायक असून शासन, प्रशासन विशेषतः आरोग्य विभागाच्या उदासिनतेमुळे काय होऊ शकते ? हेच समोर आले आहे.
डॉ. संदीप यादव यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील सर्व पॅथॉलॉजींची तपासणी करावी, बनावट सही व गैरव्यवहार रोखावेत, अशी मागणी केली होती. तरीही आजतागायत ठोस कारवाई न झाल्याने आरोग्य विभाग गांधारीच्या भूमिकेत का? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. कराडमधील कारवाईने या प्रश्नाला नवी दिशा मिळाली असली तरी प्रश्न अद्याप शाबूत असून सर्वसामान्यांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबणार कधी? आणि प्रशासन बघ्याची भूमिका सोडणार कधी? याकडे लक्ष असणार आहे.
दीड वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही...
डॉ. संदीप यादव यांनी केलेल्या तक्रारीनंतर सातारा जिल्ह्यातील ‘पॅथॉलॉजी व गैरव्यवहार’ या प्रश्नाला पुन्हा एकदा तोंड फुटलेे आहे. चुकीचे अहवाल, डॉक्टरांची बनावट सही, रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वाढते. महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961 आणि त्यानुसार 1991 मध्ये स्थापन केलेल्या बोगस डॉक्टर शोध समित्या जिल्ह्यात व तालुकास्तरावर कार्यरत आहेत.
परंतु त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणारी पुनर्विलोकन समिती 2000 मध्ये सुचवूनही आजतागायत गठीत झालेली नाही. मागील दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झाली नसून अशी पुनर्विलोकन समितीच गठीत झाली नसल्याचा दावा डॉक्टर संदीप यादव यांनी केला आहे. या समितीकडून तीन महिन्यांनी बोगस डॉक्टर शोध मोहिम समितीकडून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाणे अपेक्षित असून त्रुटी बाजूला करत कारवाईच्या सूचना देणे अपेक्षित असल्याचे मत डॉ. संदीप यादव यांनी व्यक्त केले आहे.
बोगस डॉक्टर मोकाटच
कराड तालुक्यात मागील महिन्यात परिसरातीलत एका गावात डॉक्टरने एका विवाहितेचा विनयभंग केला होता. या संतप्त प्रकारानंतर संबंधित डॉक्टरला चोप देत पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस व आरोग्य विभागाच्या चौकशीतून संबंधित डॉक्टरकडे वैद्यकीय पदवीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी विनयभंगाचा प्रकार घडला नसता तर आणखी किती दिवस त्या बोगस डॉक्टरचा दवाखाना सुरू राहिला असता आणि चुकीच्या उपचारामुळे एखाद्या रूग्णाचे बरे-वाईट झाले असते, तर त्यास कोण जबाबदार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.