सातारा : बोगदा ते यवतेश्वर दरम्यानच्या रस्त्यावर खडीच खडी पडली असल्याने दुचाकी अपघाताचे गेल्या दोन दिवसांपासून प्रमाण वाढले आहे. संबंधित खडी वाहतूक करणाऱ्या डंपर, ट्रकवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सध्या कास, यवतेश्वर, बामणोलीकडे मोठ्या प्रमाणात घरे व रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे दररोज साताऱ्यातून मोठ्या प्रमाणात डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रकमधून खडीची वाहतूक होत आहे. मात्र बोगदा ते यवतेश्वर दरम्यानच्या रस्त्यावर खडी पडली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खडीचे दगड असल्याने दुचाकीसह अन्य वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. भर उतारावरच ही खडी पडल्याने यवतेश्वरवरुन येणाऱ्या दुचाकी व अन्य वाहनांचा ताबा सुटून घसरु लागली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जण जखमीही झाले आहेत.
मात्र अनेक डंपर, ट्रक चालक प्रमाणापेक्षा जादा खडी भरुन वाहतूक करत आहेत. त्यामुळेच ही खडी रस्त्यावर पडत आहे. खडी, वीट वाहतूक करताना त्याच्यावर प्लास्टिक कागद किंवा ताडपत्री टाकूनच वाहतूक करावी, असा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नियम आहे. मात्र अनेक व्यावसायिक याला बगल देत आहेत. त्यामुळे पोलिस व आरटीओंनी अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.