सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अन् जिल्हा परिषद पंचायत समितीचे कर्तव्य एकाच वेळी आल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक सेवेत येत असल्याने नेमके प्राधान्य कशाला द्यावे, या विवंचनेत शिक्षक अडकले आहेत. कामाचा ताण वाढल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य हरवू लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरमध्ये दहावी बारावीचे वर्ष महत्वाची आहेत. या बोर्ड परीक्षा जवळ आल्यामुळे सध्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांची लगबग सुरू झाली आहे. हॉल तिकिटांचे वितरण सुरू आहे. अशातच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची लगीनघाई जोमात सुरु आहे. शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकांची कामे देण्यात आली आहेत. बोर्ड परीक्षांच्या तयारीसोबत निवडणूक कामकाज करताना शिक्षकांची मात्र कसरत होत आहे. कामाचा ताण वाढला असून इतर वर्गांचे शालेय कामकाज कोलमडत आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरसाठी दहावी बारावीची बोर्ड परीक्षा या टर्निंग पाईंट ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही दोन महत्वाची वर्षे आहेत. यावर्षी बारावीची बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च तर दहावीची 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होत आहे. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बोर्ड परीक्षांची तयारीसाठी लगबग सुरु आहे. अशातच राज्यभरात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणुकांची धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरून छाननी झाली आहे. अर्ज माघारीसाठी तीन दिवस उरले आहेत. रविवार-सोमवार शासकीय सुट्टी राहणार आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापर्यंत बंडखोरांची मनधरणी केली जाणार आहे. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांचीच माहोल निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवार अन् मतदानावर चर्चा रंगत आहेत.
या निवडणूक कामकाजात शिक्षकांंचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणुकांचे प्रशिक्षण विविध टप्प्यांमध्ये दि. 29 जानेवारीपर्यंत दिले जाणार आहे. तर प्रात्यक्षिक परीक्षेत बोर्डाच्या नियमानुसार दररोज परीक्षा घेऊन त्याच दिवशी ऑनलाईन गुण भरणे बंधनकारक आहे. ही प्रात्यक्षिक परीक्षा संच मांडणी व अन्य कामांसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी आवश्यक आहेत. मात्र निवडणूक प्रशासनाने सर्वच कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. शैक्षणिक कामकाज, लोकशाही उत्सवातील सहभाग दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने नक्की कोणते कर्तव्य आधी पार पाडावे, असा पेच शिक्षकांपुढे उभा राहत आहे. कामाचा ताण वाढल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य हिरावत आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम
दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांच्या फेब्रुवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात प्रात्यक्षिके व तोंडी परीक्षा होणार आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील शिक्षक अत्यंत महत्त्वाच्या तयारीच्या टप्प्यात आहेत. अशातच निवडणूक प्रशिक्षण व मतदानामुळे किमान चार दिवस शालेय कामकाज विस्कळीत होणार असून अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.