Narcotic injections Pudhari
सातारा

Satara Crime: गोठ्यातून नशेच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड

सैदापूरमध्ये जावई-सासरा ताब्यात; 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कराड : सैदापूर (ता. कराड) येथे म्हशीच्या गोठ्यातून बेकायदेशीररीत्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या जावई आणि सासऱ्याला कराड शहर पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकून ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुरेश नंदू कटरे (वय 63, रा. सैदापूर) आणि विकास भगवान सातपुते (वय 40, रा. सिद्धीविनायक कॉलनी, सैदापूर-विद्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डीवायएसपी राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीदारामार्फत सैदापूर गावातील हॉटेल साईगार्डनच्या पाठीमागे, लिबर्टी शॉपजवळील म्हशीच्या गोठ्यातून ‌‘मिफेन्टर्मिन सल्फेट‌’ इंजेक्शनची डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी सुरेश कटरे हा 379 रुपयांचे इंजेक्शन तब्बल 1200 रुपयांना विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून 26 मिफेन्टर्मिन सल्फेट इंजेक्शनच्या बाटल्या व एक मोबाईल जप्त केला. पुढील तपास कराड शहर पोलीस करत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार वसीम संदे, दिग्विजय सांडगे, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, हर्षल साळुंखे व धिरज कोरडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT