सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार गट) स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली असतानाच आता भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
धैर्यशील कदम म्हणाले, सातारा जिल्हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, तो आता महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे. भाजपतर्फे जिल्ह्यामध्ये 3 लाख 20 हजार सभासद नोंदणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात 10 हजार सक्रिय सभासद नोंदणी करण्यात येणार आहे, त्यांना बुथनिहाय सभासद नोंदणीचे काम देण्यात येणार आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे की जिथे रोज पक्षीय काम सुरु असते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जो निर्णय घेतील, त्यानुसार राजकीय गणिते निश्चित केली जातील. मात्र, जिल्ह्यामध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे.
दरम्यान, सर्वांत गरीब, भूमिहीन घटकांना हक्काचे पक्के घर करुन देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यानुसार देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गोरगरिबांसाठी 100 दिवसांचा रोडमॅप ठरवण्यात आला आहे. घराचं स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 45 हजार 422 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत.
पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुकाध्यक्ष महेश गाडे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती भीमराव पाटील, धनंजय पाटील, सुनील शिंदे, संतोष जाधव, एकनाथ बागडी, प्रवीण शहाणे उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचा आदेश उपलब्ध करुन देण्यासाठी दि. 22 फेब्रुवारी रोजी सातार्यातील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले व जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच सर्व गावांमध्ये यासंदर्भाने ग्रामसभा घेण्यात येणार आहेत, असेही कदम यांनी सांगितले.