ना. शिवेंद्रराजे भोसले  Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | भाजपा सर्व जागा स्वबळावर लढवणार: ना. शिवेंद्रराजे भोसले

कोरेगावात आ. महेश शिंदे यांच्यासोबत एकत्र

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर भाजप सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. वरिष्ठ पातळीवर भाजप नेतृत्वाच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आ.महेश शिंदे यांच्यासोबत एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाला असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज पंचायत समिती कार्यालयात भरण्यात येत होते. त्यावेळी भाजपा उमेदवारांसमवेत ना. शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती होती.

त्यावेळी माध्यमांशी बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ज्या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीचा तिढा होता. याबाबत अधिकृत यादी भाजपामार्फत दुपारपर्यंत मिळेल. इच्छुक उमेदवारांमध्ये अनेक जण नाराज असतातच. पण सर्वांच्या चर्चेतून एकत्र बसून हा निर्णय झाला आहे. आमचा प्रयत्न आहे की भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत सत्ता आणायची आहे. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करता यावं हा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती कर्तबगार नेतृत्व आहे हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, त्यांचा करिष्मा महानगरपालिकेत पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत आहेत. याबाबत कोणी एकत्र यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. आमचा आमच्या पक्षाच्या संघटनेवर विश्वास आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास असल्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे.

मराठा समाजाला खुला प्रवर्ग असताना देखील खंडाळा तालुक्यात खेड बुद्रुक जिल्हा परिषद गटात डावलले गेल्याचा आरोप होत आहे. याबाबत माहिती घ्यावी लागेल. आम्ही देखील मराठा आहोत. त्या मतदारसंघात जी परिस्थिती असेल त्यानुसार ही उमेदवारी जाहीर केली जात असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोणाचा असणार या प्रश्नावर बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेच घेतील. सर्वांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे, मात्र मला मी केलेल्या माझ्या सातारा तालुक्यातील कामावर पूर्ण विश्वास आहे.

माझं काम जनतेने पाहिलं आहे. या निवडणुकीत आमच्या कामाच्या ताकदीवर सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असताना जसा विधानसभेला आम्हाला यश मिळाले त्याच पद्धतीने जिल्हा परिषद निवडणुकीत जनता कार्यकर्ते यश मिळवून देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याबाबतची इच्छा होती ही इच्छा आम्ही सर्वजण पूर्ण करणार असल्याची ग्वाही ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. यावेळी राजू भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT