अविनाश कदम
खटाव : 1999 पासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या खटाव तालुक्यावर मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखालील भाजपची पकड अधिकाधिक घट्ट होत आहे. आ. महेश शिंदेंचीही चांगली साथ मिळत आहे. पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच तालुक्यावर भाजपचे वर्चस्व दिसून आले. तळागाळात भाजपची पाळेमुळे रुजायला लागल्याने दोन्ही राष्ट्रवादीवर चिंतनाची वेळ आली आहे. काँग्रेससह इतर पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याचे झेडपी निवडणुकांनी दाखवून दिले. काही प्रस्थापितांच्या पारंपरिक सरंजामशाह्या या निवडणुकीत उद्ध्वस्त झाल्या तर काही नवख्यांना तालुक्याने लढायला बळ दिले.
तालुक्यातील खटाव जिल्हा परिषद गटात निवडणुकीपूर्वी मोठा उलटफेर झाला होता. आ. महेश शिंदेंपासून फारकत घेऊन राहुल पाटील राष्ट्रवादीत गेले. जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधातेंशी त्यांची सोयरिक जुळली. एकीकडे डॉ. प्रिया शिंदेंनी निवडणूकीपूर्वी दोन महिने रान उठवले होते. राहुल पाटलांना तसा तयारी करायला कमी वेळ मिळाला. आ. शिंदेंच्या विरोधात घराणेशाहीचा मुद्दा उचलला जाईल, प्रदीपआण्णांची गटात साथ मिळेल, पुसेगाव गणातून सहकार्य होईल, अशा अपेक्षा पाटलांनी ठेवल्या होत्या. मात्र महेश शिंदेंनी धडाकेबाज प्रचार मोहीम राबवून पाटील आणि विधातेंचे मनसुबे उधळून लावले. प्रिया शिंदेंनी घासून लढतीचे विरोधकांचे अंदाज फोल ठरवत 5691 मतांनी मोठा विजय मिळवला. खटाव गणातही पॅनेल फुटून राष्ट्रवादीच्या मुगुटराव पवारांना फायदा होणार असल्याचा अंदाजही भाजपने बासनात गुंडाळून ठेवला आणि शशिकांत रोमण तब्बल 2246 मतांनी विजयी झाले. पुसेगाव गणात पुसेगावकरांनी गावचा स्वाभिमान जपल्याने स्नेहल गौरव जाधव यांनी घड्याळाचा गजर केला. स्नेहल जाधवांचा विजय आ. महेश शिंदेंना बॅकफुटवर घेऊन गेला.
बुध गटात आ. महेश शिंदेंची उमेदवार निवडण्यात गडबड झाल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होत होती. राष्ट्रवादीने या गटासह दोन्ही गणात एकमेकांना पूरक उमेदवाऱ्या दिल्याने आणि एकदिलाने प्रचार यंत्रणा राबवल्याने भाजपला मोठा सेटबॅक बसला. गटातून राष्ट्रवादीच्या लता कर्णे 1727 मतांनी विजयी झाल्या. सत्तेची समिकरणे जुळली आणि राष्ट्रवादीला संधी मिळाली तर कर्णे अध्यक्षपदाच्या दावेदार होणार आहेत. डिस्कळ गणात डॉ. महेश पवारांचा ओव्हर कॉन्फिड्न्स नडल्याने आणि काही गोष्टी गृहीत धरल्याने येथे डॉ. किशोरी पवार पराभूत होवून भाजपच्या रेश्मा शेडगे 501 मतांनी निवडून आल्या. बुध गणात मात्र पैलवान सागर साळुंखेंचा डाव यशस्वी ठरला आणि राष्ट्रवादीच्या शामली साळुंखे 2058 मतांनी निवडून आल्या. खटाव आणि बुध गट आ. महेश शिंदेंच्या कोरेगाव मतदारसंघात येतात. दोन्ही ठिकाणी निर्विवाद वर्चस्व मिळवण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षेला मात्र सुरुंग लागला. डॉ. प्रिया शिंदेंच्या प्रचारासाठी खटावमध्येच अडकून पडल्याने आ. महेश शिंदेंना बुधकडे आणि कोरेगावातही म्हणावे तितके लक्ष देता आले नसल्याचे ऐकायला मिळत आहे. सारासार विचार करता तालुक्याच्या उत्तर भागातील दोन गट आणि चार गणात भाजप आणि राष्ट्रवादीला समान यश मिळाले. या भागातील निकालाने आ. शशिकांत शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र हसू आल्याचे दिसले.
कातरखटाव गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस अभय जगतापांनी माणमधून येवून शड्डू ठोकला होता. त्यांना पुढील विधानसभेची चाहूल लागली आहे. माणमध्ये जमले नाही तर खटाव तालुक्यात जमावायचे या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला होता. भाजपचे धनंजय चव्हाण यांच्याशी त्यांचा मुकाबला झाला. अत्यंत कमी कालावधीत जगतापांनी मोठे रान उठवले. चव्हाणांना त्यांनी घाम फोडला, मात्र अनेक दिवसांची केलेली तयारी, विशाल बागल आणि सहकाऱ्यांची तगडी प्रचार यंत्रणा, मंत्री जयकुमार गोरेंचे पाठबळ या सर्व बाबींमुळे धनंजय चव्हाणांचा विजय झाला. वास्तविक अपेक्षेपेक्षा कमी 774 मतांचा विजय मिळाल्यामुळे चव्हाणांनाही विचार करायला भाग पाडले. कातरखटाव गण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षित असल्याने येथे सर्वच पक्षांनी जोर लावला होता. मात्र बाहेरील उमेदवारी नाकारुन जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आणि वनिता दुबळे 848 मतांनी विजयी झाल्या. दरुज गणातही भाजपने मुसंडी मारत विरोधकांना चपराक दिली. येथे भाजपचे हणमंत बोटे 1762 मतांनी विजयी झाले.
औंध झेडपी गटात जोरदार टशन झाले. राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या होमपीचवर चक्क ना. गोरेंचे बंधू अंकुश गोरे यांनी त्यांना आव्हान दिले होते. तसे पहायला गेले तर अंकुश गोरेंनी या गटात विधानसभा निवडणुकीपासून तयारी केली होती. हा गट अध्यक्षपदासाठी आरक्षित झाल्यावर तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या आकांक्षांना घुमारे फुटले होते. अत्यंत अटीतटीची लढत होण्याचा अंदाज असल्याने मंत्री गोरेंनीही शेवटचे दोन दिवस या गटात लक्ष घातले होते. ना. अजित पवार यांचे झालेले निधन औंधकरांसाठी अत्यंत दु:खद होते. या गटातील अनेकांशी अजितदादांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दादांना श्रध्दांजली अर्पण करायची तर गटातील राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्यायचाच अशी खूणगाठ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधली होती. समोर गोरेंचे बलाढ्य आव्हान होते. या गटात राष्ट्रवादीने कुणबी उमेदवारी दिल्याने ती स्वीकारली जाते का नाही अशीही चर्चा सुरु होती. या परिस्थितीत या गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. फेरमतमोजणी होवून राष्ट्रवादीच्या मनीषा योगेश फडतरेंनी निसटती बाजी मारली आणि गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींचा गड अबाधित राहिला. योगेश फडतरे यांनी गेल्या काही दिवसात घेतलेली मेहनत, अजितदादा व गायत्रीदेवी यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून केलेले काम त्यामुळे औंध गटात त्यांच्याविषयी सलोख्याचे वातावरण तयार झाले होते. औंध आणि कुरोली गणातही राष्ट्रवादीच्या झंजावातापुढे भाजपची वाताहत झाली. राष्ट्रवादीचे शुभम शिंदे 1022 मतांनी तर मनोज देशमुख 1091 मतांनी विजयी झाले. औंध गटात निसटता पराभव झाला असला तरी दोन्ही गणातील मोठे पराभव मंत्री गोरेंना विचार करायला लावणारे आहेत.
मायणी गटात सुरेंद्र गुदगेंना या निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवायचाच असा चंग मंत्री जयकुमार गोरेंनी बांधला होता. गुदगे पडणार आणि इतिहास घडणार अशी त्यांची टॅगलाईन सुरुवातीपासूनच प्रसिद्ध झाली होती. सुरुवातीला भाजपला तोडीस तोड उमेदवार मिळतो कि नाही अशी परिस्थिती होती, मात्र गुदगेंविरोधात मंत्री गोरेंनी ॲड. सुरज पाटलांचे कुणबी ट्रम्प कार्ड बाहेर काढले. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, मंत्री गोरेंनी केलेली विकासकामे, माजी आमदार दिलीप येळगावकरांची मुरब्बी साथ आणि मार्गदर्शन पाटलांच्या विजयात महत्वाचे ठरले. डॉ. दिलीप येळगावकर, त्यांच्या स्नुषा रेणू येळगावकर यांनी पायाला भिंगरी बांधून ॲड. सूरज पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली. गुदगेंचा हिशेब चुकता करायचा या इराद्यानेच येळगावकर पेटले होते. त्यांनी ते सिद्ध करून दाखवले. या निवडणूकीत गुदगेंना अति मात्मविश्वास नडला. तालुक्यातील स्वकियांच्या इतर शक्तीही गुदगेंच्या विरोधात कार्यरत होत्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या गटातील जनतेतील अंडर करंट गुदगेंच्या लक्षात आला नाही आणि त्यांचे अनेक वर्षांचे साम्राज्य खालसा झाले. गुदगे 1565 मतांनी पराभूत झाले. मंत्री जयकुमार गोरेंना मायणीतील विजय मोठे समाधान देवून गेला. येथील कलेढोण आणि मायणी गणातही भाजपचीच सरशी झाल्याने राष्ट्रवादी आणि खासकरुन गुदगेंना मोठा धक्का बसला. भाजपचे प्रसाद जुगदर 2426 आणि अनिता कोळी 1363 मतांनी विजयी झाल्या.
निमसोड गटात मोरे आणि देशमुख घराण्यात पारंपरिक फाईट होईल असे वाटले होते, मात्र आरक्षणाने देशमुखांना थांबणे भाग पडले. नंदकुमार मोरेंनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपशी घरोबा केला. कुणबी दाखल्यावर गटातून शड्डूही ठोकला. समोर राष्ट्रवादीने तोडीस तोड संदीप मांडवेंना आखाड्यात उतरवले. पैलवान असलेल्या मांडवेंनी निवडणुकीत सगळे डाव, प्रतिडाव वापरले. सभापतीपदाचा अनुभव गाठिशी असलेल्या मांडवेंचा जनसंपर्कही दांडगा असल्याचा फायदा त्यांना झाला. भाजपमध्ये आलेल्या आणि थेट उमेदवारी मिळवलेल्या नंदू मोरेंनाही अतिआत्मविश्वास नडला. तसे पहायला गेले तर मंत्री गोरेंनी या गटात चांगली बांधणी आणि विकासकामे केली होती. सगळ्या जमेच्या बाजू असतानाही भाजपला येथे पराभव पहावा लागला. संदीप मांडवेंनी मोरेंना चितपट केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित ताकद या गटात निर्णायक ठरली. निमसोड गटातील पराभव मंत्री जयकुमार गोरेंच्या जिव्हारी लागला आहे. निमसोड गणात मात्र वैशाली मोरे विजयी झाल्याने भाजपला थोडा दिलासा मिळाला. गुरसाळे गणात राष्ट्रवादीने वर्चस्व अबाधित राखल्याने महेश वाघ खऱ्या अर्थाने वाघ ठरले.
उत्तर कराडमध्ये सामाविष्ट असणाऱ्या पुसेसावळी गटात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मंत्री गोरेंच्या सांगडीत राहणाऱ्या धैर्यशीलदादांनी आणि विक्रमशील कदमांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. झालेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवण्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रवादीनेही या गटात नेक टु नेक फाईट दिली. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या तेजस्विनी कदम 510 मतांनी विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या रिया पिसाळ यांनाही मिळालेली 10262 मते भाजपला भविष्यातील राजकारणाचा विचार करायला लावणारी आहेत. म्हासुर्णे गणात भाजपच्या प्रगती कोकाटे 262 मतांनी विजयी झाल्या. पुसेसावळी गणात मात्र भाजपला धक्का बसला. येथे राष्ट्रवादीचे संग्राम कदम 359 मतांनी निवडून येवून जायंट किलर ठरले.
2029 साली खटाव विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र होण्याची शक्यता असल्याने मिनी विधानसभेच्या झेडपी निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्वच दिग्गज राजकारण्यांनी चांगलाच इंटरेस्ट दाखवला. काहींना अपेक्षित यश मिळाले तर काहींना सेटबॅक बसला. तालुक्यातील सर्वपक्षीय यंग ब्रिगेड राजकारणात चांगलीच सक्रिय झाल्याचे या निवडणुकीत पहायला मिळाले. तालुक्यात काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना या पक्षांना झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत भोपळा मिळाल्याने त्यांना अस्तित्वासाठी चिंतन करावे लागणार आहे.