कराड : गाजलेल्या व बहुचर्चित फलटण येथील यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विंग येथील निवासस्थानावर बुधवार, दि. 25 रोजी पहाटे छापा टाकून आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार, दि. 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बँकेत झालेल्या 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात शेखर चरेगावकर मुख्य संशयित आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह 50 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात 36 संचालक, बँकेचे तीन कार्यकारी अधिकारी, दोन व्यवस्थापक व शेखर चरेगावकर यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणात विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, यशवंत बँकेतील अपहार प्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत संशयित म्हणून शेखर चरेगावकरसह 50 जणांचा समावेश आहे. त्यात सर्व संचालक नरेंद्र भोईटे, रविंद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, सौ. स्नेहन कुलकर्णी, सौ. कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशराम जंगाणी, सौ. अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुन्द्रावळे, सौ. नीलिमा कुलकर्णी, सौ. रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे यांचा समावेश आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, सौ. वैशाली मोकाशी, कर्मचाऱ्यांत शाखा व्यवस्थापक सौ. वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, या व्यतिरिक्त शेखर चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल उर्फ मुकुंद चरेगांवकर, विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी, सौ. राही कुलकर्णी, सौ. संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सुरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे यांचा समावेश आहे. यापैकी केवळ दोघांनाच अटक झाली आहे. त्यात काही दिवसापूर्वी शौनक कुलकर्णी तर आज शेखर चरेगावकरांना अटक झाली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करताना वरील संबधितांनी त्यांची कर्तव्ये पार न पाडता, पदाचा गैरवापर करुन बँकेच्या ठेवीदार व सभासदांच्या हितास बाधा निर्माण केली आहे. त्यांनी संगनमताने 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रूपयांचा अपहार केला. त्यात 195 बोगस कर्ज खातीही केली आहेत, अशा ठपका ठेवला आहे. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल झालेल्या 50 पैकी विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णीस काही दिवसापूर्वी अटक केली होती. या गुन्ह्यातील तो मास्टर माईंड असल्याचा पोलिसांचा अंदाज होता.
त्यानुसार त्यांच्याकडे कसून चौकशी झाली. त्यानंतर या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा शेखर चरेगांवकरांचा शोध घेत होती. चरेगावकर वारंवार गुंगारा देत होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आज पहाटे तीनच्या सुमारास विंग येथील कृष्णा व्हॅलीतील त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकून चरेगवाकरांना अटक केली. फौजदार रहूफ इमानदार यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. अटक केल्यानंतर चरेगावकर यांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन मार्च पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.