खटाव : भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार गावोगावच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, लोककल्याणकारी योजना, शेतकरी, कष्टकरी, युवक वर्गासाठी आम्ही ठोस कामे करत असल्याने भाजपवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. माण-खटावमध्ये तर गावोगावी भाजपची लाट आली आहे. भाजपमध्ये होणारे जोरदार इनकमिंग विरोधकांना जिल्हा परिषद निवडणुकांच्या अगोदरच नामोहरम करत आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
माण तालुक्यातील कुकुडवाड गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले, आपल्या माण-खटाव मतदारसंघातील आपले आमदार आज राज्यात मंत्री म्हणून काम करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा मजबूत होण्यापासून पाणीयोजनांची हजारो कोटींची कामे मार्गी लागत आहेत. ग्रीन कॉरिडॉर एमआयडीसी, शक्तीपीठ महामार्गासारखी कधी स्वप्नात आली नाहीत अशी कामे साकारणार असल्याने जनतेचा आमच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. इतकी चांगली कामे होत असताना आपण विरोध करणे योग्य नाही, अशा भावना अनेकांच्या आहेत. त्या भावनेतूनच भाजपकडे येणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. भाजपमध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जात आहे. सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले जात आहे.
ना. गोरे पुढे म्हणाले, बिदाल गटातील जाधववाडी येथील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने भाजपची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. बिजवडी, पाचवड, पांगरी, वावरहिरे, शिंगणापूर, मोही येथील विरोधी पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. मायणी गटातील चितळी, मायणी, कलेढोण, पाचवड, हिवरवाडी, गारुडी, गारळेवाडी तर औंध गटातील कुरोली, भोसरे, लोणी, जायगाव, लांडेवाडी, येळीव येथील अनेकजण भाजपमध्ये आले आहेत. कुकुडवाड गटातील पळसावडे, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, पुळकोटी, गंगोती, जांभुळणी, पाणवण, वडजल येथील बहुसंख्य विरोधी पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. निमसोड गटातील मार्डी, गोंदवले, पुसेसावळी जिल्हा परिषद गटातही भाजपचे जोरदार वारे वाहत असल्याने मोठ्या संख्येने आमच्याकडे इनकमिंग होत आहे.