सातारा : भाजपने सुसंस्कृतपणा असल्याचे दाखवू नये. सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचे समजून आ. गोपीचंद पडळकरांना पुढे करुन विरोधकांवर टीका होत आहेत. हे सर्व ठरवून प्लॅन करून केलं जात आहे. आ. जयंत पाटील हे मोठे नेते आहेत, ते दबत नाहीत, त्यामुळे त्यांना ‘डॅमेज’ करण्यासाठी हे सर्व सुरू आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आ. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. ही टीका करत असताना आ. गोपीचंद पडळकर यांच्या मागे कोणी तरी आहे, म्हणून त्यांनी ही टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक टीका केली जात आहे. विधिमंडळात झालेल्या मारहाणीचे समर्थन कोण करत असेल तर कायदा, सुव्यवस्था, न्याय मागायचा कोणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या सरकारकडून दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनता याचा विचार करेल. शिस्त पाळणार्या पक्षातच आता शिस्त पाळली जात नाही. मग त्यांचे कान आरएसएसच्या प्रमुखांनी टोचावे, अशी अपेक्षाही आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.
एफआरपी ऐवजी सीएसआर फंडातून निधी गोळा करा
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता ऊस उत्पादक शेतकर्यांच्या एफआरपीतूनच 15 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पूरग्रस्तांसाठी घेणे चुकीचे आहे. सरकारने सीएसआर फंडातून आपत्तीग्रस्तांना मदत करावी. शेतकर्यांकडून कोणतीही वसुली करु नये, जिझिया कर लावला जात आहे, तो रद्द करावा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पैसे जमा करण्यासाठी अनेक मार्ग असून त्याचा अवलंब करावा, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले.