कराड ः मतदार यादीवर आक्षेप घेत मत चोरीचा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाने जबर धक्का दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबांतील पुतण्यांसह 9 जणांची नावे कराड, मलकापूरसह कुंभारगावच्या मतदार यादीत समाविष्ट असल्याचा दावा करत भाजपने त्या मतदार याद्या सादर केल्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय फायद्यासाठीच असे केल्याचा दावा पदाधिकार्यांनी केला.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी चोरीविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे संकेत दिले होते. तत्पूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 48 हजारांवर हरकत घेत त्याबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर शुक्रवारी भाजपचे तालुकाध्यक्ष पै. धनंजय पाटील, मोहनराव जाधव, सुहास जगताप, राजेंद्र यादव, सुषमा लोखंडे, अतुल शिंदे, दयानंद पाटील यांच्यासह पदाधिकार्यांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांबाबत दुबार, तिबार मतनोंदणीचा दावा केला.
पै. धनंजय पाटील, मोहनराव जाधव यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण तसेच अधिकराव चव्हाण, राजेश चव्हाण, मंगल चव्हाण, आशा चव्हाण, गौरी चव्हाण, अभिजित चव्हाण, शांतादेवी चव्हाण यांचे नाव असणारी कराड व मलकापूरमधील मतदान केंद्रावरील यादी सादर केली. तसेच राहुल चव्हाण व त्यांच्या पत्नी गौरी यांची नावे पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव कुंभारगावमधील मतदार यादीतही समाविष्ट असल्याच्या मतदार याद्याच पत्रकार परिषदेत सादर केल्या. राहुल चव्हाण यांनी तर पाटण पंचायत समितीसाठी कुंभारगावमधून निवडणूकसुद्धा लढविली होती, याचीही आठवण यावेळी करून दिली.
कुटुंबातील सदस्यांची दोन मतदार यादीत नावे आहेत. एका ठिकाणची नावे कमी करण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्यांना पत्र दिले होते. मात्र त्यांच्याकडून कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या प्रकारास निवडणूक प्रशासन जबाबदार आहे. आम्ही दोन्ही ठिकाणी मतदान केले, असा याचा अर्थ होत नाही, अशी प्रतिक्रिया इंद्रजित चव्हाण यांनी दिली आहे.