सातारा : देशांतर्गत आरोग्य सेवा क्षेत्रातील ज्ञान देणारी शिखर संस्था असलेली फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी देशांतर्गत महाविद्यालयातील कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सर्व फार्मसी महाविद्यालयातील प्राध्यापकांना बायोमेट्रिक उपस्थिती आधार लिंकड करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सन 2025 पासून नव्या सुधारणासाठीचे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
सातार्यातील गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, औषध निर्माण शास्त्र शाखेतील अभ्यासक्रम चालविणार्या देशातील फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली शिखर संस्थेची मान्यता प्राप्त पदविका पदवी व पदव्युतर पी.एच.डी अभ्यासक्रम राबवणार्या सर्व महाविद्यालयांना सन 2025 या शैक्षणिक कालावधीपासून आता प्राध्यापकांना आधार लिंकड बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्या संबंधित विषयानुसार मान्यताप्राप्त महाविद्यालयांना पी.सी.आय नवी दिल्लीने परिपत्रक पाठवले आहे. याबाबत महाविद्यालयांनी बायोमेट्रिक मशीन बसवून महाविद्यालयांनी याबाबतचा अहवाल त्वरित फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली या शिखर संस्थेकडे पाठवावा, असे आदेश विद्यालयांना दिले आहेत.
पी.सी.आय नवी दिल्लीच्या या परिपत्रकामुळे देशभरातील औषध निर्माण शास्त्र शाखेचे अभ्यासक्रम चालवणार्या महाविद्यालयांमध्ये खळबळ उडली असून अनेक महाविद्यालयांपुढे मोठा पेच प्रंसग निर्माण झाला आहे. प्राध्यापकांची कमतरता असूनही काही महाविद्यालये गोलमाल करुन हा अभ्यासक्रम चालवणार्या संस्थांचे पितळ आता उघडे पडणार आहे.या परिपत्रकामुळे महाविद्यालयाने अंतर्गत घडामोडींचा पोलखोल होणार असून अनेक महाविद्यालयांचे धाबे आता दणाणले आहेत.
यामध्ये अनेक महाविद्यालय स्तरावरील शैक्षणिक कामकाज करताना हजेरी पत्रकावर प्राध्यापकांचे नाव दाखवले जातात परंतु ते प्रत्यक्षात अन्य ठिकाणी सेवा करत असल्याच्याही तक्रारी आहेत. याची दखल पी,सी.आय नवी दिल्लीने गांभीर्याने घेतली आहे. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने आधार लिंकड बायोमेट्रिक उपस्थिती देशभरातील सर्व संलग्नता फार्मसी महाविद्यालयांना बंधनकारक केली असल्याचे काटेकर यांनी सांगितले. या संदर्भातील नियम व अटींचे पालन न करणार्या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.