वडूज : भरधाव वेगात जाणार्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दत्तात्रय नारायण इंगळे (वय 60, रा. शिरसवडी) असे त्याचे नाव आहे. हा अपघात गुरसाळे (ता. खटाव) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला.
दत्तात्रय इंगळे हे सोमवारी रात्री दुचाकी (क्र. एमएच 15 बीएस 6807) वरून शिरसवडीहून वडूजकडे येत होते. गुरसाळे गावच्या हद्दीत उंबर्डे गावानजिक एका हॉटेल समोर त्यांना समोरून येणार्या डंपर (क्र. एमएच 11 एबी 8223) ने जोराची धडक दिली. या अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. या धडकेत इंगळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सातारा व पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी (ता. 12) त्यांचे पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले. याप्रकरणी डंपर चालक विजय बाळासाहेब जाधव (रा. अंबवडे, ता. खटाव) याच्या विरोधात विष्णू नारायण इंगळे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.