वडूज : खटाव तालुक्यातील वडूज-पुसेगाव रस्त्यावर भुरकवडी गावच्या हद्दीत दोन दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, खटाव येथील शंकर दत्तू वाघ (वय 52) हा शेतकरी वडूज येथून औषधे घेऊन शनिवारी सायंकाळी घरी निघाला होता. तर भुरकवडी येथील सुनिल भिमराव कदम हा युवक आपल्या दुचाकी वरून घराकडून भुरकवडी एस. टी. स्टँडकडे निघाला असताना गावातील श्री.तुळजाभवानी मंदिरानजीक दोन्ही दुचाकींची धडक झाली. यामध्ये खटावचे वाघ हे जागेवर ठार झाले तर कदम हे गंभीर जखमी झाले आहेत.
मृत वाघ यांच्या पार्थिवाचे वडूज ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. तर कदम यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिस उपनिरीक्षक अमित शिंदे तपास करत आहेत.