आढावा बैठकीत सूचना करताना ना. शिवेंद्रराजे भोसले. शेजारी एसपी समीर शेख, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे, संतोष रोकडे, विक्रांत चव्हाण, जयंत शिंदे व इतर. Pudhari Photo
सातारा

सामान्यांचे ऐकून घेणार नसाल तर खबरदार

ना. शिवेंद्रराजेंनी अधिकारी, कर्मचार्‍यांना सुनावले : जावलीत आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

मेढा : सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून जावली तालुक्यातील प्रत्येक अधिकार्‍यांकडून जनतेची कामे झाली पाहिजेत. संवेदना दाखवणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या समस्या जाणून घेतल्या तर त्या माणसाला समाधान वाटेल. त्यामुळे त्याचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. ज्यांच्या अधिकारात आहे त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवला तर आम्ही पाठपुरावा करू. पण, सामान्य माणसाचे ऐकूनच घेणार नसाल तर आता हे चालणार नाही, अशा शब्दांमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना सुनावले. एकप्रकारे खबरदार अशी तंबीच त्यांनी दिली.

मेढा येथे झालेल्या तालुक्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष रोकडे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जलसिंचन विभागाचे जयंत शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, प्रांताधिकारी राजश्री मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे दंडगव्हाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फारांदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सपोनि सुधीर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापसिंह साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, नागरिक उपस्थित होते.

तालुक्याचे प्रश्न तालुक्यातच सुटावेत यासाठी तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जलजीवन योजनेतील सातारा जिल्ह्यातील अनेक प्रस्ताव सुधारित करण्याची आवश्यकता असून त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. याबाबत पाणी पुरवठा मंत्री यांच्याकडे मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जावली तालुक्यात एकूण 128 जलजीवन योजनेमधील कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापेकी 69 गावची कामे पूर्ण आहेत. 92 योजना सुधारीत कराव्या लागत आहेत. या सर्व कामांमध्ये अधिकार्‍यांनी जातीने लक्ष घालून जलजीवन योजनेमधील कामे पूर्ण करावीत. पिण्याच्या योजनांना विद्यूत महावितरण कंपनीनेही ज्या ठिकाणी मागणी असेल त्याठिकाणी जोडणी देणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु होऊन त्या सुरु राहणे या बाबींना प्राधान्य देण्यात यावे.

बैठकीत विविध गावच्या सरपंचांनी आपल्या समस्या मांडताना या योजनेतून एक काम झाले तर दुसरे काम होत नाही. त्यामुळे या योजना पूर्ण होत नसल्याचे सांगताना गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर गरज असलेल्या गावांच्या योजनांचा फेर सर्व्हे करावा व तशी अंदाजपत्रके तात्काळ बनवावीत व हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशा सूचना ना. शिवेंद्रराजेंनी यावेळी दिल्या. यावेळी बोंडारवाडी धरणाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असता ट्रायल पिट सुरु करण्याच्या सूचना शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. तसेच तेथील पूनर्वसन इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे सांगितले. तसेच सोळशी धरण होणार आहे, त्यावेळी त्यातील पाणीसाठ्याचा लाभ स्थानिकांना अंबवडे गावापर्यंत पिण्यासाठी व शेतीसाठी द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी सिंचन विभागाला केल्या.

यावेळी गीता लोखंडे, आनेवाडी सरपंच फरांदे, बुवासाहेब पिसाळ, संदीप परामणे, आदिनाथ ओंबळे आदींनी समस्या मांडल्या. बैठकीला बापूराव पार्टे, विजय शेलार, जयदीप शिंदे, सागर धनावडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील विविध खांत्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक लकडे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT