सातारा : शहरातील अनेक ठिकाणी पेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ खाण्यायोग्य नसून ते दूषित पाण्यापासून तयार केल्यामुळे नवीन आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शीत पेयांमध्ये बर्फ टाकून द्या, अशी ऑर्डर देण्याच्या आधी विचार करा.
शहरातील अनेक रसवंतीगृहांचे विक्रेते आणि हातगाडीधारकांना खाण्यायोग्य आणि अखाद्य बर्फाचा फरकच माहीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. औद्योगिक वापरासाठी तयार होणारा कुलिंग बर्फ हा स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्याने त्याचा सर्रास वापर होत आहे. मात्र, हा बर्फ दूषित पाण्यातून तयार झालेला असतो आणि त्यात अमोनिया तसेच घातक रसायने असतात. त्यामुळे पोटाचे विकार, घसादुखी, जुलाब, इन्फेक्शनसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. अनेक रसवंतीगृह विक्रेत्यांना खाण्यायोग्य आणि अखाद्य बर्फातील फरक समजत नाही ‘एफडीए’ने बर्फ निर्मिती केंद्रांची नियमित तपासणी आणि दूषित बर्फाच्या विक्रीवर निर्बंध लावणे आवश्यक आहे.
औद्योगिक वापरासाठी तयार होणारा कुलिंग बर्फ हा खाण्यासाठीच्या बर्फापेक्षा स्वस्त असल्याने विक्रेते त्याचा सर्रास वापर करतात. अनेक कारखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि अन्न व औषध प्रशासनाचे परवाने आहेत; परंतु तरीही हा बर्फ दूषित आणि घातक पद्धतीने तयार होतो. तोच बर्फ अनेकदा रसवंतीगृह व इतर ठिकाणी खाण्यासाठी वापरला जातो. जो अत्यंत आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडू शकतात. त्यामुळे एक तर चांगला बर्फ असल्याची खात्री करा आणि मगच खा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
खाण्यायोग्य आईसक्यूब बर्फाचा दर्जा उत्तम असला तरी किंमत जास्त असल्याने विक्रेत्यांना तो परवडत नाही. म्हणूनच ‘आईसक्यूब’ नावाने ओळखला जाणारा स्वच्छ बर्फ फक्त मोठ्या हॉटेल्स आणि बिअर बारमध्ये दिसतो.