सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील 7 लाख 98 हजार 768 महिला व युवती पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी 36 हजार 533 लाभार्थीं या योजनेसोबतच शासनाच्या दुसर्या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांचे एक हजार रुपये बंद केले असून त्यांना केवळ 500 रुपये दिले जात आहेत. दिवसेंदिवस योजनेच्या निकषांचे निर्बंध कठोर केले जात असल्याने 500 रुपयेही बंद होतील का याची धास्ती या महिलांमध्ये वाढली आहे.
गतवर्षापासून गरीब व गरजू महिलांना आर्थिक मदत होण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. सुरुवातीला या योजनेच्या निकषांनुसार सरसकट पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधून 7 लाख 98 हजार 768 महिला व युवती पात्र ठरल्या होत्या. मात्र, डिसेंबरमध्ये अर्जांची छानणी करण्यात आली. त्यामध्ये चारचाकी वाहनाची मालकी, इतर योजना, शासकीय कर्मचार्यांची नावे कमी झाली. टप्प्याटप्प्याने ही नावे वगळली जात आहेत. जिल्ह्यातील 14 हजार 868 लाडक्या बहिणींच्या नावे चारचाकी वाहने असल्याने त्या योजनेतून वगळण्यात आल्या. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणार्या महिलांना महिना एक हजार मिळत असल्याने त्यांच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे केवळ 500 रुपये जमा होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष दिवसेंदिवस कठोर होत आहेत. त्यामुळे दुहेरी लाभ नाकारल्यास हे 500 रुपये देखील बंद होतील का याची धास्ती या लाभार्थ्यांना लागली आहे.
मंत्रालयातून महिला व बाल विकास विभागाकडून ज्या-त्या विभागाकडे छानणीसाठी संबंधित महिलांची यादी पाठवण्यात येत आहे. त्यामध्ये 36 हजार महिला व युवती लाडकी बहिणसह इतर योजनेचा दुहेरी लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांची संबंधित विभागाकडून छाननी केल्यास त्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.
उत्पन्नवाढ व करदात्या बहिणी गॅसवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सरसकट लाभ दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे खर्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी टप्प्या-टप्प्याने कार्यक्रम राबवत लाभार्थ्यांची चाळणी केली जात आहे. त्यामुळे 102 महिलांनी स्वत:च या योजनेचा लाभ सोडला आहे. चालू वर्षात इन्कमटॅक्स भरणार्या, आर्थिक सक्षम तसेच उत्पन्न मर्यादा वाढलेल्या लाडक्या बहिणींदेखील आता गॅसवर आहेत.