साखरवाडी : फलटण तालुक्यातील बरड गावचे सुपुत्र व भारतीय लष्कराच्या 115 इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे हे सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेवर कर्तव्य बजावताना शहीद झाले. या घटनेने फलटण तालुका शोकाकुल बनला असून शहीद जवान विकास गावडे यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा गावकऱ्यांना लागून राहिली आहे.
नायक विकास गावडे हे भारतीय लष्कराच्या 115 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) शांतता मोहिमेंतर्गत ते शांतता राखण्याच्या जबाबदारीवर कार्यरत असतानाच त्यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शूर जवानाच्या वीरमरणाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद जवान नायक विकास गावडे
यांचे पार्थिव रविवारी दुपारपर्यंत त्यांच्या मूळगावी बरड (ता. फलटण) येथे पोहोचणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाच्या आगमनापासून अंत्यसंस्कारापर्यंतची सर्व प्रक्रिया प्रशासनाकडून समन्वयाने पार पाडली जाणार असल्याचे सांगितले.
प्रशासनातर्फे आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात येत असून, देशासाठी बलिदान दिलेल्या नायक विकास गावडे यांच्या वीरमरणामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव राहील, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.