Crime Pudhari
सातारा

Baramati case: बारामती प्रकरणाचं ‌‘फलटण कनेक्शन‌’ उघड

गर्भपात तपासात दवाखान्याचे नाव समोर : परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

फलटण : बारामती तालुक्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार व त्यानंतर झालेल्या संशयित बेकायदेशीर गर्भपात प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान फलटण शहरातील अहिल्याबाई होळकर चौक (पृथ्वी चौक) येथील एका खासगी दवाखान्याचे नाव पुढे आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार या दवाखान्यात गर्भपात केल्याचे तपासात दिसून येत आहे. बारामती तालुक्यातील संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर गर्भधारणा झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने गर्भपात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी व आरोग्य विभागाने संयुक्तपणे तपास सुरू केला असून गर्भपात नेमका कुठे, कधी आणि कोणाच्या मदतीने करण्यात आला याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात फलटण शहरातील काही शासकीय डॉक्टरांची नावेही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या तपासाचा आवाका अधिक वाढणार असून, वैद्यकीय क्षेत्रातील काही व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा संशय असून, संबंधित दवाखान्यातील नोंदी, वैद्यकीय कागदपत्रे, रुग्णालयातील स्टाफचे जबाब तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी काही महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत असून, अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासोबतच गर्भपात प्रकरणातील वैद्यकीय निष्काळजीपणा व बेकायदेशीर प्रक्रिया उघड झाल्यास आरोग्य विभागाकडून संबंधित दवाखान्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT