Makarand Patil meets Harshvardhan Sapkal Pudhari
सातारा

Makarand Patil meets Harshvardhan Sapkal: बिनविरोध ‌‘बारामती‌’साठी मकरंदआबांची शिष्टाई

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांसोबत चर्चा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत शिष्टाई केली. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मकरंदआबांच्या शिष्टाईला यशही मिळाले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेसाठी पोट निवडणुकीची घोषणा केली. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच तेथे काँग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवला होता. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची गुरुवारी, अंतिम मुदत होती. या पार्श्वभूमीवर मकरंद पाटील यांनी सपकाळ यांची भेट घेतली.

या भेटीत बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी विनंती मकरंद पाटील यांनी केली. यानंतर काँग्रेसचे उमेदवार मोरे यांनी उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यामुळे या निवडणुकीत मकरंदआबांची शिष्टाई कामाला आली.

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, या भूमिकेतून आज प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ यांची भेट घेतली. काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्याबाबत चर्चा झाली. लोकशाही प्रक्रियेला सहकार्य करत विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देण्याची भूमिका यावेळी मांडली. त्याला यश आले आहे.
- मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT