सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमधून शनिवारअखेर 49 जणांनी माघार घेतली. मात्र, अजूनही पंचायत समितीसाठी 862 तर जिल्हा परिषदेसाठी 508 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत. रविवारच्या शासकीय सुट्टीनंतर सोमवारीही प्रजासत्ताक दिन आल्याने सुट्टी आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवारचा अवघा एकच दिवस उरला आहे. त्यामुळे मंगळवारी अर्ज मागे घेण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडणार असून सध्या तरी बंडोबा नॉट रिचेबल झाल्याचे चित्र पहायला मिळत असून, बंडाच्या तयारीत असलेल्यांची समजूत काढताना नेत्यांच्या डोक्याला ताप झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडाळी उफाळून आली आहे. ती शमवण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असले तरी अनेक इच्छुकांनी पक्षाला टांग मारत बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यामुळे ए. बी. फॉर्म न मिळालेल्या पक्षाच्या उमेदवारांवर वरिष्ठ नेतेमंडळींकडून दबाव टाकला जात आहे. काही ठिकाणी अर्ज भरतानाच माघारी घेण्याच्या अर्जावर सह्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, काही इच्छुकांनी अर्ज भरुन धूम ठोकली आहे. त्यांचे मोबाईलही नॉट रिचेबल लागत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना काही ठिकाणी बंडखोरीचा सामना करावाच लागणार आहे.
महाबळेश्वरमध्ये जिल्हा परिषदेसाठी 13 तर पंचायत समितीसाठी 24, वाईमध्ये जि. प. साठी 30 तर पं.स. साठी 39, खंडाळ्यात जि. प. साठी 38 तर पं. स. साठी 54, फलटणमध्ये जि. प. साठी 57 तर पं. स. साठी 107, माणमध्ये जि. प. साठी 31 तर पं. स. साठी 72, खटावमध्ये जि. प. साठी 48 तर पं. स. साठी 85, कोरेगावमध्ये जि. प. साठी 37 तर पं. स. साठी 74, साताऱ्यात जि. प. साठी 68 तर पं. स. साठी 104, जावलीतून जि. प. साठी 24 तर पं. स. साठी 48, पाटणमधून जि. प. साठी 38 तर पं. स. साठी 67, कराडमध्ये जि. प. साठी 124 तर पं. स. साठी 188 इतके उमेदवारी अर्ज अजूनही कायम आहेत.
जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी 508 तर पंचायत समितीच्या 130 जागांसाठी 862 इतके विक्रमी उमेदवारी अर्ज कायम असून पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त बंड करण्याच्या तयारीतील उमेदवारी माघार घ्यायला तयार नाहीत, असेच चित्र समोर येत आहे. आता मंगळवार (दि. 27 जानेवारी) ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असून माघारीसाठी काही काळ उरलेला आहे. मनधरणीसाठी सोमवारचा अख्खा दिवस असला तरी माघारीचा कालावधी अवघा चार तास उरला असल्याने नेत्यांना रिझल्ट ओरिएंटल काम करण्याची जबाबदारी आपल्या निष्ठावंतांना दिली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आता केवळ एक दिवस म्हणजेच मंगळवार, दि. 27 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत मुदत आहे. त्यानंतर चिन्ह वाटप होणार आहे. त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडणार आहे. मिळालेले उमेदवार अर्ज माघारी न घेतल्यास अपक्ष संख्या जास्त राहणार आहे. त्यामुळे बंडखोरीचा मोठा धोका असल्याने मनधरणी अथवा प्रसंगी पायघड्या घालाव्या लागत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकच दिवस असल्याने बंडखोरीच्या तयारीतील उमेदवारांना थांबवण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा कस लागला आहे. या उमेदवारांना विनंती करणे, वेळप्रसंगी दबावतंत्र वापरून त्यांची मानसिकता तयार करण्यावर भर आहे.