बामणोली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असलेल्या दरे तर्फ तांब ता. महाबळेश्वर या ठिकाणी दोन दिवस गणेश उत्सवानिमित्त मुक्कामी दौऱ्यावर आले आहेत. रात्री त्यांच्या निवासस्थानी भजन व कोकणातील नावाजलेला बाल्या नाच कार्यक्रम कांदाटी खोऱ्यातील लामज गावातील तरुणांनी सादर केला. त्यानंतर गौराई गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
प्रारंभी घरातील सर्वांनी बाप्पांंची मनोभावे आरती केली. यावेळी शिंदे यांचे वडील संभाजी बाबा शिंदे, पत्नी लताताई शिंदे, भाऊ नगरसेवक प्रकाश शिंदे, सुभाष शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायत समिती उपसभापती संजय मोरे, सचिन कदम व ग्रामस्थ उपस्थित होते. आरतीनंतर भजनाच्या कार्यक्रमात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रमुग्ध झाल्याचे पहायला मिळाले.
शिंदे यांच्या निवासस्थानापासून गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली.शिवसागर जलाशयाच्या किनारी सामुदायिक महाआरती केल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात गौराई गणपतीचे विसर्जन करण्यात आले.