बामणोली : मी गावी आलो की त्यांचं राजकारण चालू होतं. त्यांचं पोट दुखायला सुरवात होते. मी दिल्लीला गेलो तरी यांच्या पोटात दुखतं. कुठेही मी गेलो तरी त्यांच्या पोटात दुखतं. त्यामुळे मी काही त्यांचा विचार करत नाही. या सर्व पोटदुखीवाल्यांंची व्यवस्था केली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेत मोफत उपचार आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टिकेची झोड उठवली.
दरे तांब, ता. महाबळेश्वर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यांना वाटलं नव्हतं की 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर होईल. मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पैसे देणेही सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जावू लागले. त्यामुळे आता हे बोलणार काय? विरोधकांकडे मुद्दाच राहिला नाही. त्यामुळे कुठल्याही मुद्याला धरून राजकारण करणं विरोधी पक्षांनी ठरवलेलेच आहे. ते नेहमीच लोकांची दिशाभूल करतात.
शेती असूद्या अथवा निवडणूक कोणत्याही विषयावर ते राजकारण करताना दिसतात. चांगल केलेल्या गोष्टीला चांगलं म्हटलंच पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्रजींना जावून बुके देत होते. चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना. आता तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी आहेत, अशी दुटप्पी भूमिका त्यांची आहे. खरं म्हणजे हे रडगाण आहे. कायमच रडत रहायचं. बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही लढायला शिकवलं. म्हणून आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललोय म्हणूनच लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.