खंडाळा : भादे, ता. खंडाळा येथील गायकवाड मळा शिवारात गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून 7 किलो 915 ग्रॅम वजनाचा सुमारे 1 लाख 97 हजार 875 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अशोक दगडू गायकवाड (वय 63, रा. भादे) यांच्याविरोधात शिरवळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादे येथील गट क्रमांक 480 मध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शेतात छापा टाकला. गायकवाड मळा परिसरातील दोन ठिकाणी 1 ते 2 फूट उंचीची अफू (खसखस) बोंडे असलेली झाडे आढळून आली. यावेळी संबंधित झाडे लावल्याची कबुली अशोक गायकवाड याने दिली. ठसे तज्ञांकडून वजन केल्यानंतर 7 किलो 915 ग्रॅम वजनाचा आणि 1 लाख 97 हजार 875 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेला माल व सी.ए. नमुने खंडाळा नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या उपस्थितीत सील करून पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. संशयित अशोक गायकवाड याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सुधाकर सुर्यवंशी, नितीन नलवडे, गिरीश भोईटे, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अक्षय बगाड, अजच मोरे, संतोष इंगवले, प्रशांत चव्हाण यांनी ही कारवाई केली.