कराड : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खाली खेचणारे कोण आहे ? हे सर्वांना माहिती आहे. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची प्रतिज्ञा केल्याने बच्चू कडूंना मंत्रीपद मिळणार नाही, असे आपणास वाटते. तसेच नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यास वेळ नसणारे मुख्यमंत्री लग्न कार्यास उपस्थित राहून काय संदेश देतात ? अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, जयंत पाटील, सौरभ पाटील, सुहास पवार, अख्तर आंबेकरी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार रोहित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97 टक्के मतदान मिळेल. मतदानादिवशी अजून दहा टक्के मतदान जास्त झाले असते, तर देशातील आजवरच्या इतिहासात त्या सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होणाऱ्या उमेदवार ठरल्या असत्या. नसरापूर घटनेनंतर न्याय मागणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्याची सरकार आणि पोलिसांची भूमिका चुकीचीच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी सरकार मान्य करत नाही. जिथे दिवंगत अजित पवार यांना न्याय मिळत नाही तिथे सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल ? असा प्रश्न आहे.
नसरापूर पीडितेच्या कुटुंबीयांसह लोकांच्या मनात हाच प्रश्न असून ते मुख्यमंत्री यांनी भेटावे अशी मागणी करत होते. मात्र मुख्यमंत्री अहिल्यानगर येथील एका लग्न समारंभास उपस्थित राहिल्याने त्यांना लग्न समारंभास उपस्थित राहण्यास वेळ आहे, मात्र पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यास वेळ नाही अ शी खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
तसेच सुमारे 91 लाख मतदारांना वगळून पश्चिम बंगालमध्ये भाजपने संविधानाच्या विरोधात कृत्य केले आहे. 15 टक्के मतदारांना मतदान करून देता विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे छुप्या पद्धतीने केले, ते पश्चिमबंगालमध्ये ऑफिशियल पद्धतीने केले गेले. तरीही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी चांगली लढत देत असल्याचे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.