शेतकर्‍यांना जातीपातीच्या राजकारणात अडकविले : बच्चू कडू File Photo
सातारा

Bachchu Kadu | शेतकर्‍यांना जातीपातीच्या राजकारणात अडकविले : बच्चू कडू

‘लाकडी बहीण’च्या आडून ईव्हीएम घोटाळा लपविला

पुढारी वृत्तसेवा

कराड : शेतकर्‍यांना जातीपातीच्या राजकारणात अडकविले आहे. जातीपातीने माथी भडकली की त्यांच्यासमोर आपले जगण्याचे मुलभूत प्रश्नच राहत नाहीत. राज्य सरकारने हे समीकरण बरोबर जुळवल्याने सरकार नेमके कसा सामान्यांशी खेळ करतेय, हे कोणालाच समजेना झाले आहे, अशी टीका करत माजी मंत्री बच्चू कडू यांनी लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करून सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला असल्याचा आरोप केला.

कराडच्या शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रहारचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, भानुदास डाईगडे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांप्रति असलेली उपेक्षा सरकारची मानसिकता दाखवते. केवळ घोषणांवर आणि जाहिरातींवर करोडो रुपये खर्च केले जातात. पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या जमिनीवर, उत्पन्नावर, कर्जमाफीवर काहीही होत नाही, हे दुर्दैव आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ दिला. लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडणुकीत मते दिल्याचे सांगितले. मात्र, लाडकी बहीण योजनेचे बुजगावणे उभे करुन सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला असून, त्या घोटाळ्यावर पांघरूण घातले.

शेतकर्‍यांची कर्जमाफी असेल दिव्यांग बांधवाचं मानधन यासह विविध मागणीसाठी बारामतीपासून आम्ही आंदोलन सुरू करत आहोत. सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प कसा सामान्य माणसापासून दूर गेला ? याची मांडणी आम्ही बारामतीत अर्थमंत्र्याच्या गावी करणार आहोत. हे लुटीचे जे सूत्र आहे; पण त्यांच्या अर्थसंकल्पात राज्यात पैसाच नाही असे सरकार सांगत आहे. आम्ही पैसा कसा निघू शकतो ? त्याची मांडणी करणार आहोत. गोरगरिबांचे, शेतकर्‍यांचे रक्त सांडू नका, रक्तदान करून तरी तुमच्या सरकारला अक्कल येऊ दे.., रक्तदान आंदोलन करून याची सरकारला जाणीव करून देणार आहोत.

अर्थमंत्री अजित पवार जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांचा पगार 55 हजार रुपये होता. आता त्यांचा पगार साडेतीन लाखांवर गेला आहे. तो पगारही वेळेत मिळतो. मी माजी आमदार आहे. माझी पेन्शन मला वेळेत मिळते. मात्र शेतकर्‍यांना भाव मिळत नाही. सध्या जो भाव आहे, त्यातच पडझड होत असते. त्यामुळे हा आर्थिक विषमता वाढत आहे. आमदारांसह खासदारांना वेळेत पगार मिळतो. मात्र शेतकर्‍यांना, दिव्यांग बांधवांना हक्काच्या पैशासाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT