बंधुता परिषदेत मार्गदर्शन करताना माजी खासदार प्रदीप रावत, विचारमंचावर उपस्थित मान्यवर. Pudhari Photo
सातारा

एकवर्णीय हिंदू समाजासाठी बाबासाहेबांचे प्रयत्न : प्रदीप रावत

कराडमध्ये पहिली बंधुता परिषद उत्साहात, वैचारिक अस्पृश्यता संपवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कराड : ‘सकल हिंदू, बंधू बंधू’ या मंत्रावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संविधानात बंधुत्वाचा उल्लेख केला आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या बंधुत्वाचा प्रचार संघ करत आहे. आज खरे राष्ट्रवादी, समाजक्रांतिकारक बाबासाहेब, सावरकर आणि शाहू महाराज बहुजन समाजापर्यंत पोहोचवले पाहिजेत. बाबासाहेबांनी घटना निर्मितीवेळी, तसेच हिंदू कोड बीलावेळी सकल हिंदू समाजाचा विचार केला. किंबहुना एकवर्णीय हिंदू समाज निर्माण करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रयत्न होता, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी केले.

कराड शहराच्या सोमवार पेठेतील भवानी मंदिर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भेटीला 2 जानेवारी 2025 रोजी 85 वर्षे पूर्ण झाली. या भेटीच्या स्मृतीप्रित्यर्थ लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बंधुता परिषदेत अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, विक्रम पावसकर, भरतनाना पाटील, रामकृष्ण वेताळ, सागर आमले, माजी नगरसेवक सौरभ पाटील, सुहास जगताप, आंबेडकरी विचारवंत अ‍ॅड. क्षितिज टेक्सास गायकवाड, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय गव्हाळे, घनशाम पेंढारकर, रणजीत पाटील, प्रकाश वायदंडे प्रमुख उपस्थित होते.

प्रदीपदादा रावत म्हणाले, इतिहासाच्या सागरातून कोळसा उघडायचा की चंदन, हे आपण ठरवले पाहिजे. आपली गावकी एक आहे. पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

गायकवाड म्हणाले, सावरकरांचे हिंदुत्व आणि बाबासाहेबांची बंधुत्वता एकत्र आणायची असेल, तर आधी वैचारिक अस्पृश्यता संपवली पाहिजे. अखंड भारताच्या निर्मितीत सावरकर आणि आंबेडकरांची भूमिका फार नितळ होती. त्यात आंबेडकर पुढे होते. त्यांच्यानंतर संपूर्ण भारतात बंधुत्वाची भावना रुजविण्याचे काम डॉ. केशवराव हेडगेवार यांनी संघाच्या माध्यमातून केले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, लहानपणापासून गावात अस्पृश्यतेचे चटके सोसले असल्याने मी बंधुतेच्या शोधात होतो. सुरुवातीच्या जीवनात तथाकथित पुरोगामी, विद्रोही लोकांनी आणि डाव्या विचारवंतांनी माझी दिशाभूल केल्याचे अनुभव मला आले. ढोंगी पुरोगाम्यांपासून दलित समाज आणि संपुर्ण देश आपण वाचवायला हवा. जातिभेद नष्ट करून बंधुता निर्माण करणे गरजेचे आहे.

अ‍ॅड. विजय गव्हाळे म्हणाले, देशाच्या फाळणीवेळी सुद्धा बाबासाहेबांनी इस्लामचा धोका वारंवार सांगितला होता. त्यांनी फाळणीविषयी कठोर भूमिका मांडली. त्यावर तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने आज बांगलादेशात हिंदू, बौद्ध बांधवांवर अत्याचार होताहेत. कलम 370 सारख्या विषयात सुद्धा बाबासाहेबांनी घेतलेल्या राष्ट्रनिष्ठ भूमिकेमुळेच आज भारत सरकार ते कलम हटवू शकले. धर्म परिवर्तन करत असताना त्यांनी भारतीय परंपरेतील बौद्ध धर्मच का स्वीकारला, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. बंधुतेसाठी हिंदू समाजाने डॉ. आंबेडकर समजून घेतले पाहिजेत. बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या बंधुत्वाची देशाला खूप गरज आहे. प्रास्ताविक आमादापुरे यांनी केले. सूत्रसंचालन वैभव डुबल यांनी केले. श्रीकांत एकांडे यांनी आभार मानले.

त्यांनी कराड शाखेस दिली होती भेट...

कराडमधील कमळेश्वराच्या देवळात संघाची पहिली शाखा होती. त्यानंतर येथील टिळक हायस्कूलच्या मैदानावर असलेल्या संघ शाखेस डॉ. केशवराव हेडगेवार यांनी भेट दिली होती. कराड नगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका सन्मान समारंभासाठी निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी भवानी मंदिर संघ शाखेस भेट दिली होती. याप्रसंगी त्यांनी संघाकडे मी आपुलकीने पाहतो, असेही म्हटले होते. त्याअर्थाची बातमीही त्याकाळी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचा दाखला केदार गाडगीळ यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT