Ayush Hospital Satara is very far away
आयुष रुग्णालय सातार्‍यासाठी कोसो दूरच Pudhari File Photo
सातारा

आयुष रुग्णालय सातार्‍यासाठी कोसो दूरच

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत प्रत्येक जिल्हास्तरावर आधुनिक सुविधानयुक्त आयुष रुग्णालय मिळू शकते. परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते सातार्‍यासाठी अद्याप कोसो दूरच राहिले आहे. केंद्रातील नव्या मंत्रिमंडळामध्ये आयुष मंत्रालयाची जबाबदारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत आयुष रुग्णालय तातडीने सुरू करण्याबरोबर व या विभागाच्या जास्तीत जास्त सुविधा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाने प्राचीन आरोग्य सेवांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी आयुष विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. 2009 मध्ये आघाडी शासनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात आयुष विभागाला सुरुवात झाली. त्यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून तशा लांब असलेल्या या सुविधा केवळ केसपेपरच्या खर्चामध्ये उपलब्ध होऊ लागल्या. आज सुमारे 250 ते 300 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात या सुविधांचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाचीही स्थापना केली आहे.

त्या माध्यमातून केवळ बाह्यरुग्ण विभाग असलेल्या आयुष विभागात आंतररुग्ण (रुग्ण दाखल करून उपचार करण्याची) सुविधाही सुरू करण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र आयुष रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 बेडचे हे रुग्णालय असणार आहे. त्यामध्ये या विभागातील उपचारासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रशासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही. तसेच हे रुग्णालय झिरपवाडी व महाबळेश्वर येथे नेण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र आयुष रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधांसाठी येतात. त्यामुळे या रुग्णांना जिल्हा रुग्णालयामधील आयुष विभागातील सुविधांचाही लाभ घेता येतो. त्यांना त्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही. त्यामुळे आयुष रुग्णालयासाठी जिल्हा रुग्णालयातील जागाच अत्यंत फायदेशीर ठरणारी आहे.

प्रश्न तातडीने मार्गी लागू शकतो पण...

केंद्रातील नव्या मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खा. प्रताप जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा कारभार आला आहे. त्यामुळे सातार्‍यातील आयुष रुग्णालयाचा प्रश्न तातडीने मार्गी लागू शकतो. यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

SCROLL FOR NEXT