तळमावले : विभागातील विविध गावांना भेटी देत स्थानिकांसोबत पाहणी वनविभागाचे अधिकारी. Pudhari Photo
सातारा

Leopard-human conflict : बिबट्या अन् मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती

वनविभागाकडून तळमावले विभागातील गावांमध्ये स्थानिकांशी संवाद; भित्तीपत्रकांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

ढेबेवाडी : वन्य प्राण्यांच्या साखळीत बिबट्याचे स्थान महत्त्वाचे आहे. मानव व बिबट्या किंवा वन्य प्राणी हा संघर्ष टाळून प्राणी जीवनाबद्दल जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी वनविभागाने जनजागृती सुरू केली आहे. सातार्‍याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी विभागात खळे, शिद्रुकवाडी, धामणी, काळगाव, गव्हाणवाडी, रामिष्टेवाडी या गावांना भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधला.

यावेळी ग्रामस्थांना बिबट्याची जीवनशैली, बिबट्याची अन्न साखळी व त्याचे महत्त्व, मानव-बिबट्या संघर्षाची कारणे, संघर्षाचे परिणाम, संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासह बिबट्याच्या वावर क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी? याची सखोल माहिती पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे यांनी दिली. त्याचबरोबर बिबट्याचे मुख्य खाद्य त्याच्या नजरेच्या पटीत म्हणजे शेळी, मेंढी, वासरू, कालवड, कुत्री, माकड, कोंबडी आदी आहे. यावेळी वनरक्षक अमृत पन्हाळे, वनरक्षक शशिकांत नागरगोजे यांनी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. आपल्या गावात जर कुठे बिबट्या बसलेला दिसला किंवा अडकलेला दिसला तर त्या ठिकाणी न जाता गोंधळ न घालता लगेच वनविभागास माहिती द्यावी, असे आवाहन अधिकार्‍यांनी केले.

माणूस बिबट्याचे खाद्य नाही, पण..

माणूस हे बिबट्याचे खाद्य नाही. जर मनुष्य त्याचे खाद्य असते, तर तो गाव वस्तीत येऊन घरातून माणसांना पकडून घेऊन गेला असता. पण तो तसे न करता मनुष्य पाहिला की पळून जातो. म्हणजेच तो माणसाला घाबरतो. मात्र लहान मुलांवर लक्ष असणे फार गरजेचे आहे. लहान मुले त्यांचे भक्ष्य नाही. पण मुले बसून, वाकून खेळतात आणि बिबट्याला कोणी चार पायाचा प्राणी आहे, असे वाटून तो हल्ला करू शकतो. त्यामुळे याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT