सातारा : साताऱ्यातील गडकर आळी येथे गुरुवारी दुपारी दोन शाळकरी मुलांवर तिघांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क नागरिकांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर तेथून पसार झाले. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी, आठवीतील दोन शाळकरी मुले शाळेतून घराकडे चालत निघाली होती. यावेळी त्या दोघांवर पाळत ठेवून तीन युवक तेथे गेले. लहान मुलांवर अरेरावी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. संशयित मुले मोठी असल्याने लहान शाळकरी मुले घाबरली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील काही नागरिक बाहेर आले. त्यावेळी संशयित युवकांनी कोयत्यासारखे धारदार शस्त्र देखील बाहेर काढले. मात्र, नागरिकांनी हटकण्यास सुरुवात केल्यानंतर हल्लेखोर युवक घाबरले. यानंतर ते तेथून पसार झाले.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नारिकांनी दोन्ही मुलांना थांबवून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत त्यांना धीर दिला. मात्र मुले घाबरली होती. प्राथमिक माहितीनुसार एकमेकांकडे बघण्याच्या कारणातून गैरसमज होवून संशयित पाठलाग करत असल्याचे घाबरलेल्या मुलांनी नागरिकांना सांगितले.