पाचगणी : पाचगणीत एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुरूवारी नागा स्वामींकडून वश करून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली. ऐन निवडणुकीत या प्रकाराते वातावरण गरम झाले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष कांबळे असे संबंधित उमेदवाराचे नाव आहे. या घटनेची नोंद पाचगणी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
संतोष कांबळे हे पाचगणीत नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत. गुरूवारी सकाळी त्यांच्या घरी नागा साधूंचा वेश केलेले दोघेजण आले. हे पाहून कांबळे घराबाहेर आले. यावेळी साधू वेशात आलेल्या दोघांनी कांबळेंना महाराज गाडीत बसले आहेत, तुम्ही निवडणुकीत उभे आहात, महाराजांचा आशीर्वाद घ्या, असे सांगितले. त्याचवेळी साधू रूपातील एका व्यक्तीने कांबळे यांच्या अंगावर अंगारा फेकण्याचा प्रयत्न केला. या अचानक हल्ल्यामुळे कांबळे आणि साधूंच्या वेशातील व्यक्तींमध्ये झटापट झाली. यावेळी गाडीत बसलेला तिसरा व्यक्तीही खाली उतरून त्यांना ओढून गाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होता. या धक्काबुक्की दरम्यान गाडीची काच फुटली. यानंतर तिघांनही पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या प्रकाराची शहरभर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे. पोलिसांनी तक्रार झाल्यानंतर सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. निवडणूक काळात उमेदवारांवर दबाव आणण्याचा किंवा वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार असू शकतो, अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.