सातारा : सातारा जिल्हा आणि परिसर हा सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पोषक आहे. त्यासाठी धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सातार्यात केली.
सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपासाठी ना. अॅड. आशिष शेलार सातारा दौर्यावर आहे. बुधवारी त्यांनी भाजप पदाधिकार्यांशी संवाद साधला. तसेच जिल्हा पदाधिकारी आणि सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना ना. अॅड. आशिष शेलार म्हणाले, सातारा परिसर हा ऐतिहासिक, धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळांसह निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. या भागात सिनेमा, मालिका यांचे चित्रिकरण सध्या केले जाते. भविष्यात या परिसराला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, चित्रपट, मालिका क्षेत्रातील कलावंत, तंत्रज्ञ यांना अधिक सुविधा कशा देता येतील, याबाबत एक धोरण तयार करण्यात येईल.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, मदन भोसले, आनंदराव पाटील, माजी सभापती सुनील काटकर, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने- कदम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, पंकज चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, ना. शेलार यांनी भाजप पदाधिकारी कार्यशाळेत पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पक्षातर्फे विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची 11 वर्षे या विषयांतर्गत संकल्प से सिद्धी या अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 21 जून योगा दिवस, 23 जून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस, 25 जून आणीबाणीचा काळा दिवस या प्रकारचे कार्यक्रम करण्यात येणार आहेत, असेही ना. शेलार यांनी सांगितले.