Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | आषाढी वारीसाठी राज्‍यात टोलमाफी : ना. शिवेंद्रराजे भोसले

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांना बांधकाम विभागाकडून गती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुलभ व्हावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विशेष पुढाकार घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. आषाढी वारीसाठी टोलमाफी, रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे.

वारी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डेमुक्ती, दिशादर्शक फलक उभारणी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी केल्‍या. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने काम करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्णयानुसार ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे.

तसेच, एसटी महामंडळाच्या टोलमाफी नसलेल्या बसेसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. संबंधित टोल कंत्राटदारांना राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे. आषाढी एकादशी २०२६ असे नमूद असलेले विशेष पास पोलिस, वाहतूक शाखा व आरटीओ कार्यालयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व टोल नाक्यांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, वाहतूक कर्मचारी, ट्रॅफिक वॉर्डन, सुरक्षा यंत्रणा आणि हँडहेल्ड मशिनची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूरसह प्रमुख मार्गांवर रुग्णवाहिका, क्रेन आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार जड वाहनांवर तात्पुरती वाहतूक बंदी घालण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT