Ashadhi Wari | पालखी सोहळ्याचे प्रशासनाकडून नेटके नियोजन File Photo
सातारा

Ashadhi Wari | पालखी सोहळ्याचे प्रशासनाकडून नेटके नियोजन

सीईओ याशनी नागराजन स्वत: फिल्डवर; वारकर्‍यांना मिळाल्या सुविधा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : दरवर्षी आळंदीहून लाखो वारकरी आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात. यंदाच्या पालखी सोहळ्यावर पावसाचे गडद सावट आहे. पावसापासून बचाव व्हावा म्हणून सातारा जिल्ह्यात मुक्कामाच्या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रे, अन्नदान, स्वच्छ पाणी, आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी, फिजोओथेरपी, हिरकणी कक्षासह वारकर्‍यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या स्वत: ग्राऊंडवर उतरल्या होत्या. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे वारकर्‍यांची गैरसोय झाली नाही.

यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्यात मोसमी पावसाचे आगमन लवकर झाले आहे. वारकर्‍यांना कोणत्याच गैरसोयीचा सामना करावा लागू नये. यासाठी सीईओ याशनी नागराजन यांनी प्रत्येक विषयाचे मायक्रो प्लॅनिंग करून सर्व विभागप्रमुखांना सोबत घेवून 15 दिवस प्रत्यक्ष फिल्डवर काम केले. सातारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून पालखी मार्गावर आरोग्याची वारी, या मोहिमेंतर्गत लोणंद, तरडगाव फलटण व बरड येथे वारकर्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती.

पालखी तळावर आरोग्य पथके 4, आयसीयू पथके 4, फिरती वैद्यकीय पथके 46, रुग्णवाहिका 12 उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 15 तात्पुरत्या आपला दवाखाना’ च्या माध्यमातून प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर मोफत आरोग्य सेवा देण्यात आली. यासाठी शेकडो अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पालखी मार्गावर आवश्यकतेनुसार वारकर्‍यांना मोफत तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. तसेच दिंडी प्रमुखांना औषधाचे किट वाटपही करण्यात आले.

स्वच्छ पाणीपुरवठा

वारकर्‍यांचे संपूर्ण वारीमध्ये आरोग्य चांगले राहावे यासाठी शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी शासकीय व खाजगी असे 89 टँकरद्वारे वारकर्‍यांना मुबलक पिण्याचे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. पाणी शुद्धीकरण, फीडिंग पॉइंट व वितरण होईपर्यंत आरोग्य कर्मचारी कायम अलर्ट दिसत होते.

प्रशासनाकडून अन्नदान

खंडाळा पंचायत समिती कर्मचारी व ग्रामस्थांकडून हजारो वारकर्‍यांना अन्नदानही करण्यात आले. यासाठी आवश्यक ती मदत झेडपीकडून पंचायत समितीला करण्यात आली. अन्नसेवा देण्यासाठी कर्मचार्‍यांनी केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

क्यूआर कोड

माऊलींच्या वारीतील वारकर्‍यांना रस्ते व मुक्काम ठिकाणाची योग्य माहिती मिळावी यासाठी 100 ठिकाणी क्यू.आर. कोड व दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. यामुळे भाविकांना इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत झाली.

ऑन द स्पॉट फैसला

माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आढावा बैठकांमधून पालखी मार्गावर ज्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत प्रत्येक सीईओंनी आपआपल्या परीने वारीची जबाबदारी पार पाडली. यावर्षी माऊलींच्या वारी यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन रात्री 12 वाजेपर्यंत तळमळतेने काम करणार्‍या याशनी नागराजन पहिल्या सीईओ ठरल्या आहेत. त्यांच्या ऑन दि स्पॉट फैसल्यांमुळे अधिकार्‍यांवरीलही कामाचा ताण कमी झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT