तरडगाव :
धावे अश्व माऊलींचा,
उधळे भक्तीचा गंध ।
रिंगणात हरपले भान,
दुमदुमला विठ्ठलनामाचा छंद ॥
या भावस्पर्शी ओळींचा प्रत्यय देणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब (ता. फलटण) येथे भक्ती, उत्साह आणि माऊलींच्या अविरत गजरात पार पडले.
माऊलींच्या अश्वाच्या दौडीने आणि वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या निनादाने अवघा परिसर भक्तिरसात चिंब भिजून गेला. ‘याची देही याची डोळा’ हा अद्वितीय सोहळा अनुभवताना लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले, तर रिंगणाच्या प्रत्येक क्षणाने भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा आविष्कार घडवला.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभे रिंगण सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर अन् विठ्ठलनामाचा जयघोष झाला. रिंगण सोहळा यावर्षीही वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला. भक्तिमय वातावरण, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर, कोणी लेकरांना डोक्यावर घेऊन तर कोणी मिळेल त्या जागी टाचा उंच करून, कोणी जवळ उभ्या असणाऱ्या वाहनाच्या टपावर तर कोणी झाडावर चढून उभे रिंगण पाहण्यासाठी आतुरले होते.
भक्तिमय वातावरणात तान्ह्या बाळापासून ते नव्वदी पार असलेले माऊली रिंगण सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यात टिपण्यात अतुर झाले होते. रंगरंगोटी केलेले, फुलांची सजावट केलेले चांदोबाचा लिंब मंदिर सर्वांना आकर्षित करत होते. अखेर माऊलींची पालखी तरडगावपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चांदोबाचा लिंब याठिकाणी पोहोचली. चोपदारांनी उभे रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी केली. सोहळ्यातील सर्व दिंड्यातील वारकरी रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर दोन रांगांमध्ये उभे राहत ‘माऊली माऊली... ग्यानबा तुकाराम’चा जयघोष सुरू करत रिंगण पूर्वीच रिंगणाची महती दाखवून दिली.
माऊलींच्या पालखी सोबत दोन अश्व होते. एकावर स्वतः माऊली तर दुसरा अश्व शितोळे सरकारांचा ज्यावर चोपदार हातात भगवी पताका घेऊन बसलेले. सर्वांच्या नजरा चोपदार दंड उंचावून इशारा कधी देत आहेत याकडे लागलेल्या. अखेर चोपदारांनी दंड उंचावून रिंगण सुरू झाल्याचा इशारा दिला. दोन्ही अश्व तुफान वेगाने रथापासून पुढे दुतर्फा उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या मानवी साखळीतील शेवटच्या दिंडीपर्यंत पोहोचले आणि पुन्हा त्याच वेगाने परत माऊलींच्या चांदीच्या रथापर्यंत पोहोचले.
अश्वांच्या टापांचा आवाज टाळ मृदंगाच्या आवाजात आपलेही अस्तित्व तेवढ्याच दिमाखात सिद्ध करत होता. शेवटी एकच गर्दी उसळली ती अश्वांच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी. माऊलींचे अश्व ज्या मार्गावरून धावत गेले त्या जागेवर फुगड्या, उंच उड्या मारून अखंड वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद साजरा केला. रथापुढे आल्यानंतर दोन्ही अश्वांना पेढ्याचा प्रसाद भरवला आणि चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण सोहळा पार पाडल्याचे संकेत देताच लाखो वैष्णव तरडगावच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झाले. केवळ आठ किलोमीटरचे सर्वांत छोटे अंतर असलेला हा टप्पा आहे.
वारकऱ्यांचा उत्साह आणि टाळ-मृदुंगाच्या
टिपेला पोहोचलेल्या स्वरात रिंगण पडले पार...
‘माऊली... माऊली...आणि ग्यानबा...तुकाराम...’च्या जयघोष वारकऱ्यांनी वारीतील पहिले उभे रिंगण पाहताना आध्यात्मिक मेजवानीचा आनंद लुटला. भक्ती, शिस्त आणि अनुशासनाचा मूर्तिमंत सोहळा या रिंगणावेळी अनुभवायला मिळला. माऊली पालखी सोहळा लोणंद येथे बुधवारी सायंकाळपासून दीड दिवसांसाठी विसावला होता. गुरुवारी दुपारी महाआरती व नैवेद्य झाल्यावर माऊलींचा पालखी सोहळा तरडगावकडे निघाला. दुपारी दोनच्या सुमारास माऊलींच्या पालखीने खंडाळा तालुक्याचा निरोप घेऊन सरदेच्या ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश केला व तरडगावनगरीत मुक्कामासाठी विसावले.