विडणी : टाळ-मृदंग व हरिनामाचा गजर करत लाखो भाविकांसह निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शनिवारी फलटण येथील एक दिवसाच्या मुक्कामानंतर बरडमध्ये विसावला. वैष्णवांचा हा मेळा रविवारी सायंकाळी दाखल होताच दर्शनासाठी भाविकांचा महापूर आला. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम करून हा सोहळा सोमवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवार, दि. 26 जूनपासून सातारा जिल्ह्यात असून, लोणंद, तरडगाव व फलटण या ठिकाणचा मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा सकाळी फलटणवरून बरडच्या दिशेने मार्गस्थ झाला. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा विडणीत पोहोचला. पालखी तळावर विसावल्यानंतर विडणी व परिसरातील लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण पालखी तळ आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. तसेच या ठिकाणी वारकर्यांसाठी भव्य असा मंडपही उभारण्यात आला होता. वारकर्यांसाठी गावातील विविध संस्था, तरुण मंडळे तसेच वैयक्तिक लोकांनीही अन्नदान, चहा-नाश्ता तसेच विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या.
विडणी येथील विसाव्यानंतर हा पालखी सोहळा पिंप्रद या ठिकाणी सकाळी 11 च्या सुमारास न्याहारीसाठी थांबला. यावेळी त्या ठिकाणी महाआरती व पूजा घेण्यात आली. तेथून पुढे हा पालखी सोहळा निंबळक वाजेगावमार्गे बरडकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. माऊलींचा पालखी सोहळा बरडमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास आल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. हा सोहळा पालखीतळावर आल्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. माऊलींच्या दर्शनासाठी बरड व परिसरातील भाविकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे झाल्यानंतर हा पालखी सोहळा सोमवारी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
दरम्यान, विडणी गावच्या हद्दीत या सोहळ्याचे सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ. मनिषा नाळे, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, मंत्रालय अव्वर सचिव धीरज अभंग, विडणी सोसायटीचे चेअरमन सोनबा आदलिंगे, व्हा. चेअरमन सौ. विजया पवार, पोलिस पाटील सौ. शितल नेरकर, गावकामगार तलाठी इंगळे तसेच ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.