सातारा

Ashadhi Wari: माऊलींना निरोप देताना लोणंदकर भावूक

‘ज्ञानेश्वर माऊली... तुकाराम...’च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने लोणंद नगरी दुमदुमून गेली

पुढारी वृत्तसेवा

लोणंद : "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक..." या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाची अनुभूती देणाऱ्या भक्तिमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी एक वाजता लोणंद येथील मुक्काम आटोपून तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाला. ‘ज्ञानेश्वर माऊली... तुकाराम...’च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने लोणंद नगरी दुमदुमून गेली.

माऊलींच्या दिड दिवसाच्या मुक्कामात लोणंद नगरी भक्‍तीरसात न्‍हावून निघाली. गुरुवारी सकाळपासूनच पालखी तळावर दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. पालखी तळावरील तंबूच्या चारही बाजूंनी भाविकांची रांग लागल्याने पोलिसांना बंदोबस्त राखताना कसरत करावी लागली. शिस्तबद्ध दर्शनासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाला भाविकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

माऊलींची नित्यपूजा, आरती व धार्मिक विधी पार पडल्यानंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास पहिला भोंगा झाला. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास गावकऱ्यांनी श्रींची पालखी शंभर मीटरपर्यंत खांद्यावर घेतली. त्यानंतर नवी पेठेतील छत्रपती शाहू चौकात विविधरंगी फुलांनी आकर्षक सजवलेल्या रथात पालखी विराजमान करण्यात आली. पालखी सोहळ्यात सर्वप्रथम सनई-चौघड्याची बैलगाडी, त्यामागे माऊलींचा अश्‍व व चोपदारांचा अश्‍व, त्यानंतर पालखीचा रथ आणि मागोमाग सत्तावीस दिंड्यांतील हजारो वारकरी "माऊली... माऊली..."चा अखंड गजर करीत पुढे सरकत होते.

गांधी चौक, शास्त्री चौक, स्टेशन चौक, अहिल्यादेवी स्मारक चौक, फलटण पूल, पोलीस स्टेशन मार्गे पालखी सोहळा पुढे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी मोठी गर्दी करून दर्शन घेतले. अनेकांनी घरासमोर रांगोळ्या काढल्या, फुलांची उधळण केली आणि हात जोडून माऊलींना निरोप दिला. खंडाळा तालुक्याची सीमा ओलांडून कापडगाव येथे फलटण तालुक्याच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी खंडाळा तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे ,तहसीलदार सुहास थोरात ,गटविकास अधिकारी अनिल वाघमारे आदी अधिकाऱ्यांनी माऊलींना निरोप दिला .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT