लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात चार मुक्कामांसाठी दाखल होत असून लाखो वारकरी आणि भाविकांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय यंत्रणा सज्ज केल्या आहेत. वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक आणि निवास अशा सर्वच स्तरांवर व्यापक नियोजन पूर्ण झाले असून पालखी सोहळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, पोलीस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, सपोनि शिवाजी जायपत्रे, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे तसेच विविध विभागांचे अधिकारी रात्रंदिवस कार्यरत आहेत.
लोणंद पालखी तळावर स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पालखी काळात अनधिकृत ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनाची दोन फिरती पथके सतत कार्यरत राहणार आहेत. सर्व विभागप्रमुखांना समन्वयासाठी वॉकी-टॉकी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी महिलांसाठी चार ठिकाणी स्वतंत्र विश्रांती केंद्रे उभारण्यात आली आहेत. लोणंद मुक्कामादरम्यान पाच गॅस एजन्सींच्या माध्यमातून सुमारे सात हजार गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी तळावर पुरेशी प्रकाशयोजना करण्यात आली असून पर्यायी व्यवस्थेसाठी जनरेटरची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेल्या नीरा दत्त घाटाची स्वच्छता करण्यात आली असून सुरक्षिततेसाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. नीरा नदीच्या जुन्या पुलावरील खड्डे बुजवून संपूर्ण डांबरीकरण करण्यात आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी संरक्षक कठडे बसवण्यात आले असून पालखी मार्गावरील काटेरी झुडपे हटवून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणांचे सपाटीकरण करून स्वच्छता करण्यात आली आहे. लोणंद शहरात विविध ठिकाणी सुमारे १८०० मोबाईल टॉयलेट ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पाणी, लाईट , स्वच्छता ,आधी सुविधा करण्यात आले आहेत या ठिकाणी २४ तास कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
आरोग्य विभागाने पालखी तळ, विसावे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी उपचार केंद्रे सुरू केली आहेत. तालुक्यातील सर्व अॅम्ब्युलन्स सेवेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रथमोपचारासाठी आरोग्यदूत पथके कार्यरत राहणार असून शासकीय रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोणंदमधील खासगी रुग्णालयांनीही भाविकांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत.