Ashadhi Wari | वारकर्‍यांसाठी सव्वातीन हजार शौचालये File Photo
सातारा

Ashadhi Wari | वारकर्‍यांसाठी सव्वातीन हजार शौचालये

1800 फिरती शौचालये : जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना

पुढारी वृत्तसेवा

सातारा : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद व प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पालखी मार्गावर विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी 1 हजार 800 फिरती शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. याशिवाय 3 हजार 250 नागरिकांनी त्यांची वैयक्तीक शौचालये वारकर्‍यांना वापरास सहमती दिली आहे.

सातारा जिल्ह्यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. 26 जून रोजी आगमन होत आहे. दि. 30 रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. वारकर्‍यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्रज्ञा माने यांनी सर्व विभागांच्या बैठका घेत सूचना केल्या आहेत. त्यानुसार नियोजन होत आहे. पाणी व स्वच्छता विभागामार्फत पालखी मार्ग, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

वारकर्‍यांसाठी शौचालय उभारणी, स्वच्छता, आरोग्य व पिण्याचे पाणी शासनाकडून देण्यात येत आहे. पालख्यांचा मुक्काम व विसावा असलेल्या गावातील ग्रामस्थांना वैयक्तीक शौचालये त्या दिवसासाठी वापरण्यास देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. शौचालय वापरास दिल्यानंतर त्यावर पांढरा ध्वज लावण्यात येणार आहे. सर्व हॉटेल्स, सभागृहे, मंगल कार्यालये आदी ठिकाणची शौचालये वारकर्‍यांसाठी देण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन तसेच इतर योजनांमधून बांधण्यात आलेली सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरूस्ती करण्यात येत आहे. त्या ठिकाणी रस्ता पाणी, वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले यांनी दिली.

लोणंद नगरपंचायत परिसरात 16 ठिकाणी 1 हजार 800, तरडगाव परिसरात 18 ठिकाणी 1 हजार 800, फलटण नगरपरिषद परिसरात 16 ठिकाणी 1 हजार 800 तर बरड येथे 19 ठिकाणी 1 हजार 800 तात्पुरती शौचालय उभारणी करण्यात येणार आहेत. मैलागाळ व्यवस्थापनासाठी 18 सक्शन मशीन, शौचालय व्यवस्थापनासाठी 72 कर्मचारी, 12 पर्यवेक्षकीय कर्मचारी, 18 पाणी टॅकर, तैनात करण्यात आले आहे. तात्पुरते शौचालय व्यवस्थापन सनियंत्रणासाठी जिल्हा परिषद स्तरावरुन अधिकारी वर्ग, जिल्हास्तरीय कर्मचारी, जिल्हा तज्ञ, बीआरसी, सीआरसी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निर्मलवारी उपक्रमास प्रतिसाद...

निर्मलवारी स्वच्छता सुविधांतर्गत पालखी मार्गावरील पाडेगाव 195, बाळूपाटलाचीवाडी 156, गोळेगाव 45, तरडगाव 408, काळज 175, सुरवडी 195, निंभोरे 114, कोळकी 516, जाधववाडी (फलटण) 450, विडणी 317, पिंप्रद 121, बरड 421, राजुरी 133 अशा 3 हजार 250 वैयक्तीक शौचालय धारकांनी वारकर्‍यांना आपली शौचालये वापरास देण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच सार्वजनिक शौचालय 256, सुलभ शोैचालय 20, मंगल कार्यालय शौचालय 50, हॉटेल्स शौचालय 170 अशी मिळून 2 हजार 964 शौचालय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT