सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 26 ते 30 जून या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. पालखी मार्गावर वास्तव्यास असणार्या नागरिकांची वैयक्तीक शौचालये वारकर्यांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे पालखी मार्गावरील वैयक्तिक शौचालयावर पांढरा झेंडा फडकणार असल्याने वारकर्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सुविधांचा फंडा उभारला आहे. निर्मल वारीमुळे स्वच्छतेची जनजागृती होण्यास मदत होणार असून उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.
वारकर्यांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा परिषद व प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निर्मल वारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पालखी मुक्काम व विसाव्याच्या गावात तात्पुरते शौचालय उभारणी करण्यात येत असते. तथापी पालख्यांमध्ये सहभागी वारकरी भाविकांची संख्या पाहता तात्पुरत्या शौचालयासोबत जास्तीत जास्त स्वच्छतागृहांची उपलब्धता व्हावी व निर्मलवारीचे हेतू साध्य होण्याकरता तालुक्यातील पालखी मार्गावरील खंडाळा तालुक्यातील पाडेगाव, बाळूपाटलाचीवाडी, गोळेगाव फलटण तालुक्यातील कोरेगाव, कापडगाव, तरडगाव, काळज, सुरवडी, निंभोरे, वडजल, जाधववाडी, कोळकी, विडणी, पिंपरद, निंबळक, बरड, राजुरी या गावातील कुटुंबांनी आपली वैयक्तीक शौचालये त्या-त्या दिवसाकरता वापरास उपलब्ध करुन द्यावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी दिल्या आहेत.
पालखी मार्गावरील जे कुटुंबे वैयक्तीक शौचालये वापरास देणार आहेत. अशा कुटुंबांची संमती घेवून घरावर पांढरा ध्वज लावण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉटेल्स, सभागृहे, मंगलकार्यालये इत्यादी ठिकाणची शौचालये वारकर्यांना वापरास उपलब्ध करुन देण्याचे आदेश बजावले आहेत. ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी गृहभेटी घेवून तेथील नागरिकांना सूचना दिल्या आहेत. निर्मलवारीमुळे स्वच्छतेची जनजागृती होण्यास मदत होणार आहे.