सातारा : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात दि. १५ जुलै रोजी आगमन होत आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत वारकऱ्यांच्या सोयी सुविधासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पालखी मार्गावरील खंडाळा व फलटण तालुक्यातील १३५ ठिकाणी वारकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर २१ अंगणवाड्यांमध्ये महिला वारकरी मुक्कामी राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातून पालखी सोहळा दि. १५ ते १८ जुलै रोजी मार्गक्रमण करणार आहे. जिल्ह्यात वारकरी भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन केले आहे. पालखी सोहळ्याचा सकाळचा विसावा पिंपरे खुर्द, दत्त मंदिर काळज, सुरवडी, विडणी तर दुपारचा विसावा निरा, तरडगाव चांदोबाचा लिंब, वडजल, निंबळक फाटा येथे होणार आहे. तर मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे होणार आहे. वारकऱ्यांसाठी १३५ ठिकाणी तात्पुरता विसावा व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच अंगणवाड्यांमध्येही महिलांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २१ ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील पाडेगाव ४, कापडगाव ६, चाळशीमळा २, तरडगाव १२, माऊलीनगर २, काळज ११, सुरवडी ७, निंभोरे ११, वडजल ३, फलटण ४, विडणी १४, पवारवाडी विडणी २, पिंपरद ८, वाजेगाव ७, बरड १८, राजुरी १५ अशा १३५ तर खंडाळा तालुक्यातील पाडेगाव २, बाळूपाटलाचीवाडी ३, गोळेगाव ४अशा ९ शाळांमध्ये वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली गेली आहे. तसेच ठिकठिकाणी स्वच्छता गृह, शौचालय युनिटची उभारणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरते २५० हून अधिक स्नानगृह प्रशासनामार्फत उभारण्यात आले आहेत.