प्रति पंढरपूर करहरनगरी भक्तिरसात न्हाहली 
सातारा

Ashadhi Ekadashi| प्रति पंढरपूर करहरनगरी भक्तिरसात न्हाहली

ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या करहर नगरीत आषाढी एकादशीचा सोहळा यंदाही अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, अभंगांच्या सुरांनी आणि ‘पांडुरंग... पांडुरंग...’च्या जयघोषाने संपूर्ण करहर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्य शासनाच्या वतीने शासकीय महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पत्यांना विठ्ठल-रुक्मिणी पूजेचा मान देण्यात आला. मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. शासकीय महापूजेनंतर हजारो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा आनंद लुटला.

या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंदिराचे पुजारी, ग्रामस्थ आणि हजारो भाविक उपस्थित होते.

आषाढी एकादशी निमित्त करहर नगरीत सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बेलोशी येथील श्री दत्तात्रय कळंबे महाराज समाधी मंदिरातून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे पादुकांचे प्रस्थान झाले. काटवली येथे पंचपदी, माऊलीच्या अश्वाचे पूजन, मानाच्या पालख्यांचे स्वागत आणि विविध संतांच्या दिंड्यांचे प्रस्थान मोठ्या उत्साहात पार पडले. महू धरण परिसरात भव्य गोल रिंगण सोहळा रंगला. त्यानंतर वारकऱ्यांनी फुगडीचा आनंद घेत हरिनामाच्या गजरात करहरकडे प्रस्थान केले.

दुपारनंतर करहर नगरीत वारकरी संप्रदायाच्या दिंड्यांचे आगमन सुरू झाले. काटवली-बेलोशी, कुडाळ-बामणोली तसेच करंडी-इंदवली परिसरातून आलेल्या संतांच्या दिंड्यांचे करहर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. दिंड्यांच्या स्वागतानंतर करहर येथे भव्य रिंगण सोहळा पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT