चाफळ : चाफळ विभागात आषाढ हा महिना सुरू होताच आखाडी जत्रांना रंगत चढण्यास सुरूवात झाली आहे. आषाढ महिन्यात शेतात आणि घराच्या कोपर्यात कोंबड्या बकर्यांचा बळी देण्याची अनेक वर्षांची परंपरा आजही नेटाने पुढे चालवली जात आहे. भावबंदकी एकत्रित येऊन पै-पाहुण्यांना आवतणं देऊन पीकपाणी व पावसावर चर्चा करत आखाडीचा आनंद प्रतिवर्षी लुटला जातो.
परंतु, यावर्षी मे महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकर्यांच्या शेतात अजूनही पेरणी झाली नाही. असे असले तरी वर्षभर शेतात काबाडकष्ट करावे लागते. त्यामुळे वर्षातून एकवेळ राखण म्हणून शेतात कोंबडी, बकरी देण्याची पूर्वीपासूनची परंपरा चालू आहे. आजदेखील तेवढ्याच जोमाने ही परंपरा चालू आहे. सध्या बकरी, कोंबडी शोधताना ग्रामस्थांची दमछाक होताना दिसत आहे. आषाढ महिना सुरू होत असताना विभागातील खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. तरीदेखील दरवर्षी पेरण्यांची थोडीफार कामे आटोपली आहेत.
पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात प्रतिवर्षाप्रमाणे आखाडी जत्रांना धूमधडाक्यात सुरूवात झाली आहे. रविवार, मंगळवार व शुक्रवार या तीन दिवशी ही जत्रा केली जाते. काही कुटुंबे, भावकी एकत्रित येत ही जत्रा साजरी करतात. त्याचबरोबर पै-पाहुण्यांनाही निमंत्रणे धाडली जातात. महागाईचा दर गगनाला भिडला असला तरी वाडवडिलांनी सुरू केलेली परंपरा आणि देवाचं देणं यामुळे ते द्यावेच लागतंय, ते ठेवून चालत नाही, अशी रूढ आज या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही इथल्या समाजात रूजली आहे.
यावर्षी मुसळधार पावसाच्या संकटामुळे ना भावकी एकत्र ना पै-पाहुण्यांना निमंत्रण. त्यातच या आकाडी जत्रांमुळे चरेगाव येथे शनिवारी भरणार्या बाजारात कोंबड्या, बकर्यांचे दर गगनाला भिडले असल्याने अनेकजण बाजारात कोंबड्या व बकर्या न बघता त्या गावोगाव फिरून कोंबड्या बकर्या शोधताना ग्रामस्थांची पुरती दमछाक होत आहे. आकाडी जत्रांमुळे ज्यांच्याकडे बकरी कोंबडी आहेत. त्यांनी मनाला येईल ते दर लावल्याने बकर्या-कोंबड्यांच्या किमती गगणाला भिडल्या आहेत. कोंबडा घेण्यासाठी 700 ते 1000 रूपये मोजावे लागत आहेत. तर काळ्या, खरड्या व उलट्या पंखाच्या कोंबडीला चांगलाच दर द्यावा लागत आहे.